‘‘खरं सांगू का आप्पा, मी फक्त आणि फक्त एवढाच विचार केला की मुलं लहान आहेत. यदाकदाचित अशी वेळ माझ्या नातवावर आली तर त्याला माझ्यासारखा आजोबा भेटावा. तुझ्यासारखा नाही. केवळ एवढय़ाच भावनेने, विचाराने मी पैसे दिले.’’ असं सांगत नानांनी आपलं म्हणणं आप्पाच्या गळी उतरवलं.

अवघे पाऊणशे वयमान मिरवणारे नाना काणे आणि आप्पा काळे ही जोडगोळी. दोघेही एकाच खासगी कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले. उच्च अभिरुची दर्शविणारा, ऋतुमानानुसार बदलणारा पेहराव. नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा खुलवणारी सस्मित मुद्रा, सुखासीन आयुष्याचे द्योतक होती. एकाच सहनिवासात वास्तव्य होतं आणि घरच्या आघाडीवरही शांतता होती. अगदी गोकुळ होतं. दोघांमधील गाढ मैत्री हा बघणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय असे. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ या काव्यपंक्ती आपल्या दिलखुलास, मोकळ्या आनंदी स्वभावाने दोघे खोटय़ा ठरवत होते. अगदी मस्तीत जगत होते म्हणा ना!
रोज सकाळी हलका व्यायाम, मग जोडीने तलावाभोवती चकरा, हास्य क्लबमधले हास्याचे मजले, अधूनमधून परस्परांना आग्रह करत वडा किंवा भजी यांचा आस्वाद आणि संध्याकाळी एखादी व्याख्यानमाला, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब, अत्रे कट्टा, नाटक असे नानविध कार्यक्रम. यापैकी काहीच नसेल तर मित्रांबरोबर राजकारणावर मनसोक्त चर्चा. हे झाल्यावरच दोघांची पावले घराकडे वळायची. कधी फिरण्याचे ठिकाण बदलायचे. सुखात जेवढं चालता येईल तेवढं चालायचं, थांबावंसं वाटलं की थांबायचं. रिक्षा किंवा बसने परत यायचं. कधी सकाळच्या वेळी बसमध्ये बसून शेवटच्या स्टॉपपर्यंत जायचं आणि तसंच परत फिरायचं.
दोघांचं चांगलं मेतकूट होतं. त्यातही नाना काणे दिलदार, अजातशत्रू होते. आप्पा काळे थोडेफार त्यांच्यासारखेच होते. दिलखुलास होते. पण नन्नाचा पाढा किंवा नकारार्थी दृष्टिकोन किंवा विरोधाचा सूर आळवायची त्यांना सवय होती. अर्थात नानांच्या खुसखुशीत बोलण्याने या सगळ्या गोष्टी लटक्याच ठरायच्या. ‘अरे हा वडा चांगला असेल ना’, ‘घरी परतायला फार उशीर होईल रे’ किंवा ‘रिक्षा मिळाली नाही तर’ असे प्रश्न उपस्थित करायची आप्पांना सवय होती. अर्थात नानांच्या ‘काही नाही रेऽऽ’मध्ये ते विरूनही जायचे.
त्या दिवशी सकाळी दोघांनाही बसमध्ये बसून मस्त फिरून यावंसं वाटलं. नेमकी बसही बोलावल्यासारखी लगेच आली. बसायला जागाही मिळाली. शहर जागं होताना दिसत होतं. मस्त बाहेरचं निरीक्षण आणि आपापसात दृष्यविश्वाचं धावतं वर्णन चालू होतं. शाळेची वेळ होती त्यामुळे चढणाऱ्यांमध्ये मुलांची गर्दी होती. कंडक्टरचं कट्, कट् चालू होतं. त्यांच्या सीटच्या दांडय़ाला धरून दोन मुलं उभी होती. तोंडावळ्यावरून बहुतेक भाऊ-भाऊ असावेत, असं वाटत होतं. मोठा साधारण दहा-अकरा वर्षांचा आणि धाकटा पाच-सहा वर्षांचा. मोठय़ाने धाकटय़ाला जबाबदारीने व्यवस्थित, काळजीपूर्वक धरले होते. नानांच्या शेजारीच ते उभे होते आणि नानांच्या नातवाएवढेच होते. म्हणून नाना सहज त्यांच्याकडे बघत होते. त्याला हाताने आधार देत होते. कंडक्टर आला. धाकटय़ाला दांडा घट्ट पकडायला सांगून मोठा खिशातून पैसे काढू लागला. बघता बघता मोठय़ाचा चेहरा कावराबावरा झालेला नानांनी पाहिला. बहुतेक पैसे सापडत नव्हते. स्वारी घाईत घ्यायची विसरली असावी. नानांना शंका आली. मोठय़ाने खिसा अगदी पँटच्या बाहेर काढला. दुसऱ्या खिशात पाहिले, शर्टच्या खिशाची चाचपणी केली. स्वत:चा तोल सावरत पाठीवरची स्कूल बॅग पुढे घेतली. कंपास उघडून पाहिली. बॅगेचे खिसे तपासले. तो पैसे काढत होता तेवढय़ात उरलेल्यांना तिकिटे देऊन कंडक्टरने पैशासाठी हात पुढे केला. मोठय़ाच्या एकूण आविर्भावावरून कंडक्टरला शंका आली.
‘‘काय रे पैसे विसरलास की काय?’’ कंडक्टरने थोडय़ा गुर्मीतच विचारलं.
‘‘मला आठवत नाहीये पण आज बहुतेक मावशी पैसे द्यायचं विसरलेल्या दिसताहेत,’’ मोठय़ाचा चेहरा पडला होता.
‘‘बघ नीट बघ असतील इकडे तिकडे कुठेतरी.’’
‘‘नाही काका, मी सगळीकडे पाहिलं, पण मी उद्या तुम्हाला नक्की देईन. आज आमची परीक्षा आहे. काका प्लीज आम्हाला शाळेपर्यंत जाऊ द्या नं.’’
‘‘असं कसं जाता येईल बाबा, उतरा इथे,’’ कंडक्टर तोंडची वाफ दडवत होता. ‘‘मी आज एक दिवस या डय़ूटीवर आलो आणि त्याची चाट खिशाला कुठे बसवून घेऊ.’’
‘‘रात्री आजीला जास्त बरं नाही असा फोन आल्यामुळे आई-बाबा तडक तिकडे गेले. आई नसल्यामुळे सकाळी उठल्यावर हा लहान भाऊ रडत बसला. आमच्या घरात काम करणाऱ्या मावशींनी आमचं आवरून दिलं. पण भावाला तयार करण्यात मी पैसे घ्यायचे विसरलो. मावशींना रोजची सवय नसल्यामुळे त्या पण विसरल्या. उद्या मी आपल्याला नक्की पैसे आणून देईन. आमची वार्षिक परीक्षा चालू आहे. परीक्षेला नाही बसलो तर वर्ष फुकट जाईल.’’
‘‘अरे उद्या माझी डय़ूटी कुठे लागेल काय माहीत.’’
‘‘मग मी त्या रोजच्या काकांकडे पैसे देईन.’’
आपला खिसा हलका होतोय की काय, या विचाराने कंडक्टर त्रासला होता. द्विधा मन:स्थितीत होता. मोठय़ाची घालमेल बघून नानांना रहावलंच नाही. त्यांनी ताबडतोब कंडक्टरला हाक मारली. ‘‘हे घ्या दोघांच्या तिकिटाचे पैसे’’ म्हणत नानांनी कंडक्टरला पैसे दिले. कंडक्टरने ‘‘काय ही बेजबाबदार मुलं, आम्हाला कट्कट्’’ असा भाव आळवत पैसे घेऊन मुलांना तिकीट दिले. ‘‘चला प्रश्न तर सुटला’’ या भावनेने कंडक्टरने टाकलेला सुस्कारा नानांच्या नजरेतून सुटला नाही.
‘‘छान पेपर लिही बरं का दादा’’, नानांनी हळूच दादाच्या पाठीवर थोपटलं. इतका वेळ आक्रसून गेलेला दादाचा चेहरा कृतज्ञतेने तरळू लागला. धाकटा मात्र अजून डोळे चोळतच उभा होता.
‘‘आजोबा मी उद्या नक्की तुमचे पैसे परत करीन. तुम्ही याच बसला याल का?’’
त्याच्या चेहऱ्यावरचा संमिश्र भावनांचा गोंधळ टिपत नाना म्हणाले, ‘‘अरे आतापर्यंतचं सगळं विसरून जा आणि शांत चित्ताने पेपर सोडव. ऑल दि बेस्ट.’’
इतका वेळ शांत बसलेले आप्पा विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरत नानांना म्हणाले, ‘‘नाना, हे तू बरोबर केलं नाहीस. या मुलांना अशी नाटकं करून पैसे उकळायची सवय असते. एकदा अद्दल घडली असती म्हणजे पुढच्या वेळेला सावध झाला असता आणि तो खरंच सांगत होता हे कशावरून, खोटंही बोलला असेल. अशा वेळी आपण पैसे देणं म्हणजे चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घातल्यासारखं होतं. कालच्या पेपरात वाचलंत ना, ९४ टक्के मार्क मिळवणारा मुलगा चैनीसाठी घरफोडी करायला लागला आणि त्यात पकडला गेला.’’
‘‘मान्य आहे आप्पा, तुझा दृष्टिकोन संपूर्ण चुकीचा आहे, असं मला म्हणायचं नाही. तू म्हणतोस तसं तो खोटंही बोलत असेल. पण असंही वाटतं की एखादेवेळीस तो खरंही बोलत असेल. ती शक्यताही नाकारता येत नाही. या दोन मुलांना बसमध्ये बसवून एका बाईला मी परत जाताना पाहिलं. खरं सांगू का आप्पा, मी फक्त आणि फक्त एवढाच विचार केला की मुलं लहान आहेत. यदाकदाचित अशी वेळ माझ्या नातवावर आली तर त्याला माझ्यासारखा आजोबा भेटावा. तुझ्यासारखा नाही. केवळ एवढय़ाच भावनेने, विचाराने मी पैसे दिले.’’
नानांनी आपलं म्हणणं आप्पाच्या गळी उतरवलं होतं. त्यामुळे ‘‘आहेस बाबा तू अगदी जगावेगळा, मानलं तुझ्या दूरदृष्टीला’’ म्हणत विरोधी पक्ष मूग गिळून बसला.
बस स्टॉप आल्यावर दोघेही खाली उतरले. सहनिवासात शिरताना नानांच्या सूनबाई रिक्षा थांबवून धावत घराकडे वळताना दिसल्या. न रहावून नाना म्हणाले, ‘‘काय गं पैसेबिसे घ्यायला विसरलीस की काय?’’
‘‘नाही हो, पैसे विसरले असते तर कुणाकडून तरी मिळाले असते, पण गडबडीत मी ऑफिसच्या किल्ल्या विसरले. अध्र्या वाटेत गेल्यावर लक्षात आलं म्हणून रिक्षा उलटी फिरवली.’’
‘‘होतं असं गडबडीत विसरायला कधी कधी.’’ म्हणत नानांनी आप्पांकडे सहेतुक बघत डोळे मिचकावले.