बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा जोधपूरमधील उमेद भवन येथे थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नात प्रत्येक गोष्ट खास असावी याकडे निक-प्रियांकाने विशेष लक्ष दिलं होतं. राजेशाही थाटात लग्न करणाऱ्या जोडीच्या लग्नात हत्ती,घोडे या प्राण्यांचा वापर करण्यात आला.  मात्र या प्राण्यांच्या वापरामुळे ‘पेटा’ या (PETA) प्राणी सुरक्षा संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदविला आहे.

प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेटाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या घटनेवर आक्षेप नोंदवला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नात प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारची साधने वापरली जातात हे दाखविण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच या साऱ्याचा प्राण्यांवर होणारा परिणामही त्यात स्पष्टपणे दाखविला आहे.

‘लग्न हा तुमच्यासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असेल.पण प्राण्यांसाठी तो अत्यंत वाईट दिवस असतो. त्यांचे या दिवशी अतोनात हाल होत असतात’, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे. दरम्यान, पेटाने केलेल्या या ट्विटवर निक प्रियांका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे निक प्रियांकाने लग्नात फटाक्यांची आतिषबाजी केल्यामुळे यापूर्वीच हे लग्न चर्चेचा विषय ठरलं आहे.