पाकिस्तानचा तडाखेबाज माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. भारताविरूद्धच्या त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा त्याला टीकेचा सामना करावा लागतो. तरीदेखील क्रिकेटविश्वात अजूनही तो फलंदाजीला आला की गोलंदाजांना धडकी भरते. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघातून त्याने निवृत्ती घेतली असली तरी टी२० किंवा टी१० लीग स्पर्धांमध्ये मात्र तो अजूनही सहभागी होतो. आता युएईमध्ये होणाऱ्या अबुधाबी टी१० लीग स्पर्धेतही आफ्रिदी सहभागी होणार आहे. मात्र युएईमध्ये दाखल होताच त्याच्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला.

IPL 2021 Auction: ठरलं!! ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव

अबुधाबी टी१० लीग क्रिकेट स्पर्धेत शाहिद आफ्रिदी कलंदर्स संघाकडून खेळणार आहे. त्यासाठी शाहिद आफ्रिदी युएईमध्ये दाखल झाला. पण विमानतळावरच त्याला अडवण्यात आलं आणि युएईमध्ये प्रवेश करण्यास नकार देण्यात आला. पाकिस्तानी प्रसारमाध्यम ‘द न्यूज’च्या वृत्तानुसार, आफ्रिदीचा युएईमधील वास्तव्यासाठी लागणारा व्हिसा संपला होता. आफ्रिदीला ही बाब लक्षात आली नव्हती. पण जेव्हा तो युएईमध्ये दाखल झाला तेव्हा विमानतळावर अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्याला युएईत प्रवेशापासून रोखण्यात आलं.

ICCने सुरू केला नवा पुरस्कार; ऋषभ पंत, शार्दुल ठाकूरसह चार भारतीय शर्यतीत

व्हिसा नुतनीकरणासाठी त्याला कराचीला जावं लागेल आणि तिथून परवानगी घेऊन झाल्यानंतर त्याला युएईत येता येईल असं अधिकाऱ्यांनी आफ्रिदीला सांगितलं. त्यामुळे आफ्रिदी पुन्हा कराचीला आला. आता व्हिसा नुतनीकरण झाल्यानंतर तो दोन दिवसांनी पुन्हा युएईत दाखल होणार आहे.