शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान पुन्हा एकदा विरोधी पक्षांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे सोमवारी परांडा येथे महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते. “शिवसेना-भाजपा महायुती पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या सात बारा संपूर्ण कोरा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या भागाचा विकास का झाला नाही?. पंधरा वर्षे या भागातील जनतेने निवडून दिलेले आमदार काय झोपा काढतात काय? असा सवाल करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.तानाजी सावंत यांना निवडून देण्याचे आवाहन केलं. विकास काय असतो ते प्रा. सावंत दाखवुन देतील, असंही उद्धव ठाकरेंनी सांगीतलं.

युतीचे सरकार सत्तेवर आल्यास गोरगरीबांच्या अरोग्याची काळजी घेण्यासाठी केवळ एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी, दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण, मोफत बस पास तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मागणी तेथे बस अशा योजना आमची सत्ता आल्यास राबवणार आहोत. शेतकऱ्यांना वर्षाकाठी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय हा शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात घेतला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते म्हणुन शेतकरी त्या पिकांचा विमा भरतो . शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी त्याला मिळावी तेवढी भरपाई विमा कंपन्या देत नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या विमा कंपन्या बंद करण्याची शिवसेनेची मागणी सरकारकडे आहे त्यासाठी सत्ता आल्यास राज्य सरकारच्या मालकीचीच विमा कंपनी स्थापन करावी”, अशी शिवसेनेची मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

युतीच्या सरकारने चांगली कामे केली आहेत . परंतु जी कामे शिवसेनेला चांगली वाटली नाही त्याला आम्ही विरोधच केला, वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात आंदोलनही केलं . शेतकऱ्यांचा आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना कदापी गप्प बसणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मंत्री असताना दोन अडीच महिण्यात सावंत यांनी चांगली कामे केल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.