तो नुकताच कामावरुन घरी आला होता. मी त्याच्यासाठी चहा ठेवला होता. तितक्यात शेजारी घरी धावात आले व हिंसक झालेला जमाव बाहेर लोकांची हत्या करतोय असे सांगितले. तो तसाच त्यांच्यासोबत बाहेर पडला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, निदान चहा तरी पिऊन जा असे मी त्याला सांगितले. पण इतरांना वाचवण्यासाठी तो शेजाऱ्यांसोबत घराबाहेर पडला. त्यानंतर जमावाने त्याला खेचून नेले. माझ्या मुलाची त्यांनी हत्या केली असे दिल्लीतील हिंसाचारात ठार झालेल्या त्या अधिकाऱ्याच्या आईने सांगितले. मंगळवारी दिल्लीत जमावाच्या हिंसाचारात इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरापासून एक किलोमीटर अंतरावर नाल्यामध्ये आयबीच्या या अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला. “जमावाने माझ्या मुलाला खेचून नेल्यानंतर मी लगेच तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण पोलिसांनी मला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले. त्याने मला धक्का बसला. मी मुलाला शोधण्यासाठी रुग्णालयात गेले. रात्रभर मी जागे होते. मी शक्य त्या सगळया ठिकाणी त्याचा शोध घेतला” असे या मातेने सांगितले.

आणखी वाचा – दिल्लीत जमावाच्या हल्ल्यात इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

नाल्यामध्ये या तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने कुटुंबाला जास्त दु:ख झाले आहे. शेजाऱ्यांनी स्थानिक राजकारण्यांना दोष दिला असून, कुठलीही कृती न केल्याबद्दल घोषणा दिल्या. चांद बागसह उत्तर पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये सोमवार-मंगळवार असे दोन दिवस मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला.