काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमध्ये बांधला जाणारा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, देशभरातल्या नागरिकांसाठीचं मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, “आम्ही अनेकदा स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे देखील देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या सरकारने आमच्या सर्व शिफारशी एक तर दुर्लक्षित केल्या किंवा फेटाळल्या. त्यामुळेच देशातल्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केलं आहे”, असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

या पत्रामध्ये विरोधी पक्षांनी नमूद केलेल्या मागण्या :

१. केंद्र सरकारच्याच माध्यमातून जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही स्तरावर शक्य त्या सर्व स्त्रोतांकडून लसींचा साठा मिळवावा.

२. देशभरात सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा व्यापर कार्यक्रम तातडीने राबवण्यात यावा.

३. देशांतर्गत लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी परवाना मिळवणं सक्तीचं करण्यात यावं.

४. लसींसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला ३५ हजार कोटींचा निधी यासाठी खर्च करण्यात यावा.

५. (दिल्लीतील) सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा.

६. देशातील अगणित खासगी ट्रस्टमधील निधी आणि पंतप्रधान सहायता मधील सर्व निधी अधिकच्या लसी, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वापरण्यात यावा.

७. सर्व बेरोजगारांना किमान ६ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात यावेत.

८. गरजूंना मोफत अन्नधान्याचं वाटप करण्यात यावं. (जवळपास १ कोटी टन इतकं धान्य केंद्र सरकारच्या गोदामांमध्ये सडू लागलं आहे.)

९. करोनाच्या संकटात शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत. जेणेकरून शेतकरी भारतीयांसाठी अन्नधान्याचं उत्पादन करू शकतील.

एकूण १२ नेत्यांच्या वतीने पत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पाठवण्यात आलेलं हे पत्र एकूण १२ नेत्यांच्या वतीने पाठवण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतच माजी पंतप्रधान आणि संयुक्त जनता दलाचे एच. डी. देवेगौडा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी, जेकेपीएचे फारूख अब्दुल्ला या नेत्यांचा समावेश आहे.