वन-डे मालिका ३-० ने गमावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिकेतही पिछाडीवर पडलेली आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखत मात करत १-० ने आघाडी घेतली. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉच्या पायांना सूज आल्यामुळे त्याने गुरुवारी सरावसत्रात सहभाग घेतला नाही. टीम इंडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तो अखेरच्या कसोटीत खेळू शकेल की नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईकर पृथ्वी शॉला पहिल्या कसोटी सामन्यात सलामीला येण्याची संधी मिळाली. मात्र दोन्ही डावांमध्ये पृथ्वी अपयशी ठरला. पहिल्या डावात पृथ्वीने १६ तर दुसऱ्या डावात अवघ्या १४ धावा केल्या. मात्र यानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉची पाठराखण केली होती. मात्र या दुखापतीनंतर पृथ्वी अखेरच्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान शुभमन गिलने गुरुवारी नेट्समध्ये चांगला सराव केला. त्यामुळे पृथ्वीची दुखापत वेळेत बरी न झाल्यास शुभमन गिलला सलामीला येण्याची संधी मिळू शकते. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गिलने फलंदाजीचा सराव केला.