माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निर्घृण हत्या झाली. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये तामिळनाडू राज्यातील श्रीपेराम्बूदूर येथे रात्री आयोजित केलेल्या एका प्रचार सभेत भाषण करण्यासाठी ते व्यासपीठाकडे निघाले होते. जमलेल्या असंख्य चाहत्यांच्या गर्दीतून ते जात असता अचानक धानू नावाच्या मानवी बॉम्बचा स्फोट झाला आणि राजीव गांधी आणि सभोवतालच्या गर्दीतील अनेक जणांच्या अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला.

राजीव गांधी हे आपले बंधू संजय गांधी यांच्या अकाली अपघाती निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या साहाय्यासाठी कॉंग्रेस पक्षात सक्रीय झाले. आणि पुढे खलिस्तानी शक्तींनी केलेल्या इंदिराजींच्या हत्येमुळे देशाच्या पंतप्रधानपदावर ऐन तरुण वयात, राजकारणाचा फारसा अनुभव नसताना त्यांना विराजमान व्हावे लागले. त्यावेळी राजकीय नेतृत्वाबरोबरच हा नवखा आणि प्रारंभी राजकारणात यावयास अनुत्सुक असलेला तरुण देशाची ही भलीमोठी धुरा कशी काय पेलणार, याबद्दल संशय आणि प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली होती. परदेशात शिक्षण झालेल्या, आधुनिक विचारांच्या या सुसंस्कृत व सौम्य प्रकृतीच्या राजबिंडय़ा तरुण नेत्याने सत्ता हाती घेताच मात्र देशाला अत्यंत वेगाने आधुनिकतेकडे नेण्याचा जणू चंगच बांधला. देशाला संगणक युगात नेण्यासाठी त्यांनी कंबर कसली. राजकारणातील भीषण साठमारी, वाटेवरचे काटेकुटे, धोके आणि विलक्षण गुंतागुंत यांना आपल्या परीने यशस्वीपणे तोंड देत अल्पावधीतच राजीव गांधी यांनी आसाम तसेच पंजाब समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आणि  आपल्या परिपक्व राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले. मात्र, बोफोर्स तोफा प्रकरणातील घोटाळ्याचे नस्ते शुक्लकाष्ट त्यांच्यामागे लावून त्यांना त्यांच्या हितशत्रूंनी सत्ताभ्रष्ट करण्यात यश मिळवले. परंतु त्यानंतर आलेले सरकारही फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांत राजीवजींचा काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल आणि त्यांचे तरुण, द्रष्टे नेतृत्व देशाला पुन्हा एकदा प्राप्त होईल असा संपूर्ण देशाला विश्वास वाटत होता. परंतु पेराम्बुदूरमध्ये झालेल्या त्यांच्या अविश्वसनीय हत्येने सगळे चित्रच पालटले.

राजीव गांधींच्या भीषण हत्येनंतर या घटनेशी संबंधित  संशयितांची यथावकाश धरपकड झाली. श्रीलंकेतील तामीळ बंडखोरांच्या बेछुट, सशस्त्र कारवायांना पायबंद घालण्यासाठी राजीव गांधी यांनी श्रीलंकेच्या विनंतीवरून त्यांच्या सत्ताकाळात भारतीय लष्कर (शांतीसेना) श्रीलंकेत पाठविले होते.  त्यामुळे तिथल्या तामीळ बंडखोरांचा राजीव गांधींवर कमालीचा रोष होता. ते पंतप्रधानपदी असताना श्रीलंका दौऱ्यात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही एकदा झाला होता. १९९१ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल आणि पंतप्रधानपद पुन्हा राजीव गांधींकडे जाईल आणि आपल्या बंडखोर संघटनेच्या नि:पातासाठी श्रीलंका सरकार पुन्हा भारताकडे लष्करी मदतीची मागणी करेल आणि ती भारताकडून पुरविली जाईल, या आशंकेने श्रीलंकेतील तामीळ बंडखोरांच्या ‘टायगर्स ऑफ तामिळनाडू ईलम्’ या विभाजनवादी संघटनेचा सूत्रधार प्रभाकरन् याने कट रचून राजीव गांधी यांचा काटा काढण्याचे ठरवले आणि तो त्यात यशस्वीही झाला.

पोलीस तसेच सुरक्षाविषयक विविध तपास यंत्रणांनी राजीव-हत्येमागील हा तामीळ बंडखोरांचा धागा पकडून अनेक संशयितांची धरपकड केली. भारतातील न्यायालयीन चौकशी आयोगानेही या संशयास दुजोरा दिला. मुख्य म्हणजे हाच निष्कर्ष भारत सरकारनेही शेवटी अधिकृतपणे मान्य केला. राजीव-हत्येत सहभागी झालेल्या आरोपींवर यथावकाश खटले चालले आणि त्यात त्यांना पुढे विविध प्रकारच्या शिक्षाही ठोठावल्या गेल्या.

तामीळ बंडखोरांनी श्रीलंका या स्वतंत्र, सार्वभौम देशाचे विभाजन करून तामीळभाषकांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याच्या फुटीर मागणीसाठी प्रदीर्घ काळ सशस्त्र आंदोलन छेडले होते. ते लष्करी कारवाईद्वारे संपुष्टात आणण्यासाठी श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी तत्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे लष्करी मदतीची मागणी केली होती आणि त्यांची विनंती मान्य करून राजीव गांधींनी श्रीलंका सरकारच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडय़ा तिथे शांतीसेना म्हणून पाठविल्या. परंतु तरीही तिथला तामीळ-सिंहली वाद काही शमला नाहीच. उलट, तो आणखीनच चिघळत गेला. राजीवजींच्या या कृतीने तिथले तामीळ बंडखोर बिथरले. ते या गोष्टीचा सूड घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते. ती शेवटी भारतातील निवडणुकांदरम्यान राजीवजींची तामीळनाडूत हत्या करून त्यांनी साधली. या हत्येतील प्रत्यक्ष दोषींना पकडून त्यांना नंतर शिक्षाही झाल्या आणि हे प्रकरण सरकारच्या व लोकांच्या दृष्टीनेही तिथेच संपले.

तथापि, अनेक अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी राहिलेले पत्रकार फराझ अहमद यांनी मात्र राजीव-हत्येच्या या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहत काही प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. भारत सरकारच्या पोलीससंबंधित तपास यंत्रणांचे अहवाल, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील चौकशी समित्यांचे अहवाल आदींच्या आधारे साधारणपणे एकमताने प्रभाकरन् आणि तामिळ ईलमसाठी स्थापन झालेल्या त्याच्या संघटनेनेच योजनाबद्ध रीतीने राजीव गांधी यांचा कायमचा काटा काढल्याच्या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब झालेले असले तरीही फराझ अहमद यांना मात्र या हत्येच्या घटनेमागचा खरा हेतू काय, या तार्किक प्रश्नाने कमालीचे अस्वस्थ केले होते. म्हणूनच त्यांनी राजीव-हत्येच्या संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल अभ्यास करून परिश्रमपूर्वक या प्रकरणाचा मागोवा घेतला. आणि त्यातूनच फराझ अहमद यांचे ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ हे पुस्तक आकारास आले. त्याचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे. मूळ इंग्रजी ग्रंथाचे शीर्षक ‘अ‍ॅसेसिनेशन ऑफ राजीव गांधी : अ‍ॅन इनसाइड जॉब?’ असे आहे.

जॉन एफ. केनेडी, बेनझीर भुट्टो, इंदिरा गांधी आदी अनेक जागतिक नेत्यांच्या खळबळजनक हत्यांच्या प्रकरणांबद्दल संबंधित देशांच्या सत्ताधाऱ्यांनी संशयित गुन्हेगारांची धरपकड केली. न्यायालयात त्यांच्यावर खटले भरले गेले आणि दोषी ठरलेल्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेसारख्या शिक्षाही सुनावल्या गेल्या. त्या शिक्षा पुढे अमलातही आल्या. परंतु राजीव गांधींच्या हत्येच्या घटनेशी निगडित कटकारस्थानांमध्ये सामील झालेल्या आरोपींचा शोध घेऊन न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतरही सरकार तसेच सर्वसंमत न्यायालयीन निष्कर्षांवर (म्हणजे श्रीलंकेत स्वतंत्र तामीळ ईलम्च्या स्थापनेसाठी सशस्त्र आंदोलन करणारी संघटनाच राजीव गांधींच्या हत्येची सूत्रधार आहे, या गृहितकावर) विश्वास ठेवण्यास अद्यापही अनेक साक्षेपी घटक तयार नाहीत. या हत्येच्या कटासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून लेखकाने ज्या अनेक मुद्दय़ांचा मागोवा घेतला, त्यांत या हत्येमागे खरा हेतू काय होता? प्रभाकरन वा शिवरासन किंवा या दोघांनी कोणाच्या सांगण्यावरून ‘सुपारी’ घेऊन हे कृत्य केले होते का? भारताबाहेरच्या हितसंबंधांचा विचार केला तर श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रेमदास यांच्याकडेही यासंबंधात संशयाची सुई वळते. परंतु कालांतराने बंडखोरांनी त्यांचीही हत्या केली. राजीव गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेस पक्षाला कोणता फायदा होणार होता, याबद्दल तपास यंत्रणांना चौकशी करण्याची भीती तरी वाटली असावी, किंवा मग त्यांना हे गूढ उकलण्यात अजिबातच रस नव्हता. परंतु कार्तिकेयन, जैन, वर्मा आदींच्या नेतृत्वाखालील यंत्रणांच्या तपासातून पुढे करण्यात आलेला हत्येमागचा हेतू हा पोकळ आणि कोणताही पाया नसलेला होता, एवढे मात्र नक्कीच- असे लेखकाने ठामपणे या पुस्तकात सूचित केले आहे. मग यात कोण गुंतलेले होते? देशातील काही राजकारण्यांकडेही यासंदर्भात संशयाने पाहिले जात होते. मात्र, त्यांच्या राजीव-हत्येतील कथित सहभागाबद्दल ठोस पुरावे न मिळाल्याने असेल, किंवा त्यादृष्टीने तपास यंत्रणांनी तपासच न केल्याने असेल, राजीव-हत्येमागील  खरे सूत्रधार आजही पडद्याआड राहिले आहेत, अशी दाट शंका पत्रकार फराझ अहमद यांना वाटत होती. या छुप्या सूत्रधारांची पाळेमुळे तर्काधारे खणण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. त्यासाठी राजीव-हत्येच्या चौकशीतील कच्चे वा दुर्लक्षित दुवे त्यांनी समोर आणले आहेत. त्यातून काही प्रश्न निश्चितपणे उभे राहतात. परंतु त्यांचा पाठपुरावा ना कॉंग्रेस पक्षाने केला, ना कुठल्या सरकारने किंवा ना माध्यमांनी केला. याची खंत लेखकाला कायम वाटत राहिली. आणि त्यांनी आपल्या परीने त्याचा माग शोधण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. त्यांच्या तर्काना काही आधारही आहेत हे पुस्तक वाचताना पटते.

हे पुस्तक वाचून खाली ठेवताना राजीव गांधींच्या हत्येमागील गूढ अद्यापिही पुरते उकललेले नाही, त्यात काही त्रुटी राहिल्या आहेत, हे निश्चित.. हा विचार वाचकांच्या मनात प्रकर्षांने आल्याशिवाय राहत नाही.

‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’, 

मूळ लेखक- फराझ अहमद,

अनुवाद- अवधूत डोंगरे,

रोहन प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- २८६, मूल्य- २५० रुपये

एकनाथ बागूल