तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटात विजयी सुरुवात केली आहे. भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव केला. भवानी देवीने फक्त सहा मिनिटं १४ सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिलं आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती.

भवानी देवीचा एफआयई रँक ४२ असून नादिया ३८४ व्या क्रमांकावर आहे. सुरुवातीपासून भवानीने वर्चस्व ठेवलं होतं. पहिल्या हाफमध्ये भवानी देवीने ८ पॉईंट्स मिळवले होते. दुसऱ्या हाफमध्येही नादिया पुनरागमन करु शकली नाही आणि भवानी देवीने भारताला तलवारबाजीतील पहिलं यश मिळवून दिलं.

भवानी देवी ऑलिम्पिकमधून बाहेर

मात्र दुर्दैवाने भवानी देवीचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटविरोधातील सामन्यात भवानी देवीचा पराभव झाला आहे. ७-१५ ने भवानी देवीचा पराभव झाला असून ऑलिम्पिकमधील तिच्या प्रवासाला पूर्णविराम लागला आहे.