वृद्धांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या चिंता निर्माण करणारी वाटत असली तरी त्यांच्यासाठीच्या व्यवस्थेचा विचार केल्यास यापूर्वी नव्हती इतकी नवीन क्षेत्रे खुली होत आहेत. शिक्षण, मनोरंजन, औषधे वा आरोग्य सेवा, खाद्यसुविधा, अर्थव्यवस्थापन, कायदेशीर सल्ला, वृद्ध निवास, पर्यटन, समुपदेशन, सुरक्षा व्यवस्था या सर्व क्षेत्रांत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास वृद्धांचे आयुष्य सुखकर होऊ शकतेच, पण इतरांसाठी व्यवसायाची अनेक दालने उघडू शकतात. साहजिकच वृद्धांची वाढती समस्या न वाटता संधी ठरू शकेल. उद्या १ ऑक्टोबरच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने वेगळा विचार मांडणारा लेख.

एखाद्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज लक्षात येण्यासाठीसुद्धा ‘अनुभवाची’ आवश्यकता असते असे लक्षात येतेय. वाचताना कदाचित हे थोडे अविश्वासार्ह वाटण्याची शक्यता आहे; पण वाढत्या वृद्धसंख्येमुळे अगदी ७-८ वर्षांमध्ये समाजातील जवळजवळ प्रत्येक घटकावर जे काही मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे त्याची पुसटशीसुद्धा कल्पना आपल्यापैकी कोणालाही जाणवत नाही ही वस्तुस्थिती आहे, यावरून हे सिद्ध होते. ही वस्तुस्थिती का निर्माण झाली याचा विचार केला तर जाणवते, की वाढती वृद्धसंख्या ही ‘समस्या’ यापूर्वी कधीही, कोणीही अनुभवलेलीच नाही. त्यामुळे त्याच्या सर्वव्यापी परिणामाची कल्पना येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण झपाटय़ाने बदलणाऱ्या सामाजिक स्थितीचा वेग पाहिला तर वृद्धसंख्येतल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ शकेल.

bjp meeting
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार!
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?
sp leader shreya verma
उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी

हे बदल वृद्ध स्वत: एक व्यक्ती या संदर्भात जसे होणार आहेत तसेच ते वृद्धांचे कुटुंब, वृद्धांसाठी आवश्यक असणारी जागा, रुग्णालये, वृद्धनिवास, शहरीकरण, कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक क्षेत्रावर होणार आहेत. त्यासाठी आवश्यकता आहे ती ‘वृद्धवैद्यकशास्त्र’ आणि ‘वृद्धकल्याणशास्त्र’ या शास्त्राच्या अभ्यासाची.

वृद्धांचे आयुष्य वाढल्याने त्यांची संख्या वाढते आहे, यापुढे वेगाने वाढणार आहे; पण आजही भारतामध्ये वृद्धवैद्यकशास्त्र (ॅी१्रं३१्रू२) नावाचे वैद्यकीय क्षेत्रातले एक शास्त्र आहे याची माहिती अगदी बोटावर मोजता येईल इतक्या वृद्धांना किंवा लोकांना आहे. अफाट संख्येच्या वृद्धांचा अभ्यास करण्यासाठी अजून भारतात पूर्ण वेळाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम एकाही वैद्यकीय महाविद्यालयात नाही. सर्वसामान्यांपेक्षा सर्वच शास्त्रांमध्ये वृद्धांचा विचार एका वेगळ्या दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे, गरज असते याची नोंद समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र कोणत्याच सामाजिक शास्त्रामध्ये घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वृद्धकल्याणशास्त्र (ॅी१ल्ल३’ॠ८) नावाचे तुलनेने अगदी अलीकडचे पण वेगाने विकसित झालेले असे एक शास्त्र आहे याची माहिती नसावी यात काहीच आश्चर्य वाटायला नको. ‘वृद्धवैद्यकशास्त्र’ आणि ‘वृद्धकल्याणशास्त्र’ या दोन्ही शास्त्राचा अभ्यास करण्याची फार मोठी गरज आहे, तरच आपला भारत वृद्धसमस्या अधिक जाणतेपणाने हाताळू शकेल.

वयाची वाढलेली १० वर्षे ही सर्वच गोष्टीत वाढ घडवणारी ठरणार आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले, तर या वयात आरोग्याच्या समस्या अपरिहार्यपणे निर्माण होतात. त्या दोन प्रकारच्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. सध्या ज्येष्ठांची दूरचित्रवाणी पाहण्याची आणि करमणूकप्रधान जीवनशैली पाहता त्यांना योग्य व्यायाम न केल्याने होणारा शारीरिक त्रास वाढण्याची शक्यता असतेच. त्यापेक्षा जास्त धोका मानसिक आजारांचा आहे. या वयात असे होणार म्हणून विस्मरणाकडे दुर्लक्ष केल्याने वाढणारी व्याधी ही व्यक्तीपुरती मर्यादित न राहता कुटुंबाची होते. कुटुंबाकडे तेवढे मनुष्यबळ नसेल तर त्यांना इतरत्र ठेवावे लागले, तर किमान दर वर्षी ५ लाख रुपये (४० हजार महिना) याप्रमाणे आर्थिक बोजा वाढतो. त्यावर उपाय म्हणून ज्येष्ठांनी भरपूर व्यायाम शरीराला आणि मेंदूलाही देणे आवश्यक आहे. परावलंबित्व आले तर मग विचारायलाच नको. ज्येष्ठांमध्ये मानसिक रोगांचे प्रमाण वाढते आहे, हे मनोविकारतज्ज्ञ सांगत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी स्वत: ज्येष्ठाने प्रयत्नशील व्हायला हवे.

आता ‘शतायू’ अनेक आढळतात. घर लहान असेल तर वृद्धाला जागा कोठून आणि कशी देणार? मोठय़ा शहरात तर जागेचा प्रश्न आणखी तीव्र होतो. लहान गावात ठेवावे तर वैद्यकीय सोयी पुरेशा नसतात. घरात वृद्ध एकटा ठेवता येत नाही, कारण प्रश्न सुरक्षिततेचाही असतो. घरातल्या माणसांना एकत्र बाहेर जाणे किंवा गावाला जाणे अशक्य होते. त्यामुळे काळजी घेणारा फारच एकटा पडत जातो. या अडकून पडल्याच्या भावनेमुळे मानसिक ताण निर्माण होतात. येणाऱ्या काळात जागेचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे यात शंका नाही.

ज्येष्ठांनी स्वत:ची आर्थिक आघाडी भक्कम करून ठेवली असेल तर प्रश्न कमी गंभीर होतो. पण सध्या जे ७०-७५ वर्षांचे आहेत त्यांच्याबाबतीत आर्थिक बळ चांगले असण्याची शक्यता कमी आहे. कारण या पिढीचे उत्पन्न मर्यादित होते. पगार शेकडय़ांत, हजारांत होते. लाखांत नव्हते. त्यातून ते फार पैसे वाचवू शकलेले नाहीत. सेवा निवृत्तिवेतन नसणारे बहुसंख्य ज्येष्ठ आहेत. त्यांची आर्थिक तरतूद मर्यादित असते. अशा परिस्थितीत जो काळजी घेणारा प्रौढ असतो त्याला त्यांच्या मुलांसाठीही पशाची गरज असतेच. हल्लीच्या काळात तर शिक्षणावर बराच खर्च करावा लागतो. अशा वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेकदा याचा सर्वात जास्त परिणाम वृद्धांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावर होण्याची शक्यता वाढते. आई-वडील की मुले? स्वत:चे आरोग्य की आई-वडिलांचे आरोग्य? ठरवणे फार कठीण होते.

अपुऱ्या वैद्यकीय सोयी, अपुरी दळणवळणाची साधने, नोकरीसाठी मुलांचे अपरिहार्यपणे मोठय़ा शहरातले वास्तव्य, करमणुकीच्या साधनांचा अभाव यामुळे एक वेळ धडधाकट असताना ज्येष्ठ निदान काही प्रमाणात खेडेगावात छोटय़ा मूळ गावात राहतात पण एकदा का वय वाढले, की वृद्धाला शहराचा रस्ता धरावा लागतो. नोकरदार मुलांनाही सारखे गावाकडे जाण्यापेक्षा वृद्ध माता-पित्यांना शहरात घेऊन येणे परवडते. बरेचदा शहरात आले तरी एकत्र न राहता स्वतंत्र वेगळ्या घरात राहण्याचा पर्याय स्वीकारला जातो. अशी अनेक वृद्ध दाम्पत्ये शहरात राहताना दिसतात. याचा परिणाम शहराच्या अधिक असलेल्या लोकसंख्येत भर पडण्यात होतो. शहरात वृद्धांचा वावर करण्यावर निश्चितपणे मर्यादा येतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. यात प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ होताना आढळते. सर्वेक्षणाप्रमाणे ज्येष्ठांचे हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा श्वसनाच्या विकाराने जास्त मृत्यू होतात, असे लक्षात आले आहे.

शहरातल्या जागेच्या टंचाईमुळे आणि घरांच्या प्रचंड किमतींमुळे शहरात जागेसाठी, मालमत्तेसाठी ज्येष्ठांचा छळ होतो. ‘हेल्प एज इंडिया’च्या सर्वेक्षणामधून हे वारंवार सिद्ध झाले आहे, की शहरात ज्येष्ठांच्या छळाचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढते आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या वृद्धांसाठीच्या हेल्पलाइनवर ८० टक्के तक्रारी या मालमत्तेसंदर्भात असतात असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यावरून हे स्पष्ट होते आहे, की वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे यातही वाढच होणार आहे.

वाढत्या प्रसिद्धी माध्यमाच्या प्रभावामुळे पुढच्या पिढय़ांच्या मनोवृत्तीत झपाटय़ाने बदल होत आहेत. कुटुंबातही स्वप्रतिमाप्रेम, स्वयंकेंद्रित दृष्टिकोन मोठय़ा प्रमाणात आढळतो. दुसऱ्यासाठी आपल्या काही गोष्टी सोडणे, वेळ देणे, मनाला मुरड घालणे या गोष्टी सहजपणे तर होत नाहीतच पण अपवादात्मक आहेत, असे लक्षात घ्यावेच लागते. परवानगी घेणे, सल्ला देणे तर दूरच पण बाहेर जाताना सांगून जाण्याची, जेवणार नसल्याची कल्पना घरातल्यांना देणे याची आवश्यकताही पुढच्या पिढीला वाटत नाही हे सत्य वृद्धांना पचवावे लागते आहे. यापुढेही तसेच त्यांना स्वीकारावे लागणार आहे.

या सर्व विवेचनाचा सूर काहींना निराशावादी वाटण्याची शक्यता आहे; पण त्यातले तथ्य समजून घेतले तर हा सूर निराशेचा नसून ‘जागल्या’चा आहे, सर्वासमोर आरसा धरण्यासारखा आहे. या सर्व आव्हानांना एक सोनेरी किनार आहे. वृद्धांच्या वाढत्या संख्येने काही अडथळे, मर्यादा निर्माण झाल्यासारख्या दिसल्या तरी त्यात अनंत संधी आहेत.

पर्यटन व्यावसायिकांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यायला सुरुवातसुद्धा केली आहे. पूर्वी तीर्थयात्रेपुरता मर्यादित असणारा व्यवसाय आता पाचही खंड व्यापून टाकतो आहे. जे त्याच्या आविर्भावात देशांमागून देश आणि खंडांमागून खंड पादाक्रांत करणारी ‘सीनियर’ मंडळी अलीकडे पर्यटन व्यवसायाचा मोठा आधार बनून गेले आहेत. यासाठी वेगळ्या पुराव्याचीही गरज नाही इतके ते स्पष्टपणे लक्षात येते आहे.

तीच गोष्ट प्रसिद्धी माध्यमांची. मालिकांचा टी.आर.पी. ज्येष्ठांमुळे किती तरी वाढतोय. वयाची ५०-५५ पार केलेले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री छोटा पडदा व्यापून आहेत, इतकेच नव्हे तर साधी सोज्वळ भूमिकांची कात टाकून खलनायिकासुद्धा (नकारार्थी भूमिका) बनल्या आहेत. पडद्यावरच नव्हे तर पडदा सोडून विविध तास-दीड तासांचे कार्यक्रमही धूमधडाक्याने करत आहेत. ज्येष्ठांचे कोणतेच कार्यक्रम आता करमणुकीच्या कार्यक्रमांशिवाय यशस्वी होत नाहीत, असा आयोजकांचा अनुभव आहे. त्यामुळे किती तरी गायक, वादक, नकलाकार, एकपात्री प्रयोग करणाऱ्यांना संधी मिळते आहे, ही केवढी मोठी जमेची बाजू आहे.

जी गोष्ट पर्यटनाची, करमणुकीची तीच गोष्ट खाद्यपदार्थाची. हॉटेल त्यातल्या त्यात डायनिंग हॉलमध्ये ज्येष्ठांची संख्या पाहा! किती डबेवाले आहेत, किती पोळीभाजी केंद्रे जागोजागी निघत आहेत. त्यांचे मुख्य ग्राहक मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ असतात. फिरायच्या ठिकाणाची नाश्ता केंद्रे जोरात चालतात ती बहुतांशी ज्येष्ठांच्या पाठिंब्यावर हे सहज लक्षात येते.

तीच गोष्ट औषधांची. केमिस्ट उगीच नाही ज्येष्ठांना थोडी फार सूट देत, कारण त्यांचे नियमित उत्पन्न देणारे ग्राहक ज्येष्ठ असतात. रुग्णोपयोगी साहित्याची विक्री आणि भाडय़ाने देणाऱ्यांची संख्या गेल्या ५-७ वर्षांत किती तरी वाढली आहे. ‘अ‍ॅडल्ट डायपर’ ही कधी कल्पनाही केली नव्हती इतक्या मोठय़ा खपाची गोष्ट आहे आणि या सर्वात भरपूर कमाई आहे. रुग्णोपयोगी साहित्याच्या क्षेत्रात संशोधनाला खूप वाव आहे, कारण वृद्धांच्या गरजांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेच आहे.

वृद्धांची घरी काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे मदतनीस- म्हणजे मामा आणि मावश्या या नोकऱ्यांमुळे अनेक गरजू अशिक्षित स्त्रिया कुटुंबाचा आधार बनत आहेत आणि ती सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या संख्येत वेगाने, पण अनियंत्रित वाढ दिसते. त्यावर मोठय़ा प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यापूर्वी नव्हती इतकी नवीन क्षेत्रे वृद्धांमुळे खुली होत आहेत. त्यातले एक म्हणजे मानसोपचार, समुपदेशन. वृद्धांचे ढासळते मानसिक आरोग्य हा विषय चिंतेचा आहे; पण याचे प्रमाण वाढत असल्याने त्या प्रकारच्या संस्था किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आता गरजेचे बनलेले आहेत. मनोविकारतज्ज्ञांकडे तरुणांच्या बरोबरीने ज्येष्ठ दिसून येतात. वृद्ध मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च संकटे ओढवून घेत आहेत. त्यातले सर्वात मोठे संकट डिमेन्शिया म्हणजे विस्मरणाचा रोग हे आहे. कुटुंबाच्या सुख-समाधानाला तडा जाणाऱ्या या रोगाचे मूळ ज्येष्ठांच्या दुर्लक्षातच आहे. त्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची- सेवकांची फार मोठी गरज आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र नर्सिग होम्स निघत आहेत.

‘स्थलांतर’ हे एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे ज्येष्ठांचे प्रश्न वाढत आहेत. खेडय़ातून छोटय़ा गावात, गावातून शहरांमध्ये, शहरातून दुसऱ्या राज्यांमध्ये आणि राज्यांमधून  दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर अगदी स्पष्ट आहे. त्याचा सर्वात जास्त परिणाम ज्येष्ठांवर होतो आहे. मुलाला परदेशात लठ्ठ पगारावर नोकरी मिळाल्याच्या अभिमानाचे काही वर्षांनी हताशपणात रूपांतर होते आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न आहेच. ज्यांच्यावर विसंबून राहावे अशी पोलीस यंत्रणा आणि इतर सेवासुविधा पुरवणाऱ्या  संस्थांचा ज्येष्ठांकडे  पाहाण्याचा दृष्टिकोन ज्येष्ठांना दिलासा वाटावा असा तर नाहीच आहे; पण कटकटे, वेळखाऊ अशीच त्यांच्याबद्दल भावना आहे. त्या आघाडीवरही बिघाडी आहे. ज्येष्ठांबद्दल एक सकारात्मक मदत करण्याचा दृष्टिकोन असणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात तो बऱ्याच प्रमाणात नकारात्मक आहे.

रिक्षावाले आणि ज्येष्ठ यांचे नाते विळ्या-भोपळ्याचे आहे. ज्येष्ठांना खूप गरज आहे, पण रिक्षावाल्यांना ते नको आहेत. एक रिक्षावाल्याशी या संदर्भात बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर फार गंभीरपणे घेण्याची गरज जाणवते. तो म्हणाला, ‘‘मी म्हाताऱ्या व्यक्तींना घेतच नाही. एक तर त्यांना नीट पत्ता सांगता येत नाही. कधी कधी तर कुठे जायचे तेच विसरतात. जवळ काही फोन नंबर, पत्तेपण ठेवत नाहीत. त्यांना घेऊन कुठे आणि कुठवर फिरावे. पोलीस आमच्याच गळ्यात मारतात आणि वर दमदाटी करतात. शिवाय जास्त पैसे द्यायला किटकिट करतात. त्यापेक्षा म्हातारी माणसे नको असेच वाटते.’’ ज्येष्ठांसाठी विश्वसनीय वाहतूक व्यवस्थेची किती मोठी गरज आहे हे यावरून स्पष्ट होते.

कायदा सल्लागारांनाही ज्येष्ठांमुळे खूप वाव आहे. मालमत्तेच्या अडचणी, मुलांशी न पटणे, वृद्धांचा होणार छळ, त्यांची इच्छापत्रे तयार करणे याच्या संधी तरुण वकिलांनासुद्धा खूप आहेत.

आणखी एक वर्ग वृद्धांमुळे गब्बर होतो आहे. अर्थ सल्लागार. पूर्वी ‘बँकेत’ पैसे ठेवणे नाही तर ‘पोस्टात’ ठेवणे असे ठोक मार्ग होते. ते पुरेही पडत होते. आता वाढती महागाई आणि वाढत्या गरजा यामुळे उत्पन्नवाढीच्या योजनांकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे. वृद्धांसाठी अर्थसल्ला हा इतरांसाठी सल्ला देण्यापेक्षा वेगळा विषय म्हणावा लागेल, कारण त्यांच्या गरजा भिन्न असतात. मालमत्तेचे व्यवस्थापन हे पण क्षेत्र नव्याने खुले झाले आहे. ज्येष्ठांना त्यांच्या स्वत:च्या मालमत्तेची बिले, कर भरणे, नोंदणी करणे, खरेदी-विक्री करणे, घर, फ्लॅट भाडय़ाने देणे, पेइंग गेस्ट ठेवणे अशा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत लागते. एक तर मुले परदेशी असतील तर त्यांच्याकडे जाण्याचा कालावधी मोठा असतो तेव्हा व्यवस्था पाहावी लागतेच. इतकेच नव्हे तर परदेशातल्या मुलांनी इथे केलेल्या फ्लॅट, प्लॉट किंवा तत्सम मालमत्तेसंदर्भातही बरीच कामे असतात. त्यासाठी मालमत्तेचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसांची गरज आहेच. आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वृद्धसहनिवासांची फार फार मोठी गरज आहे. त्यासाठी नियोजनपूर्वक कोणत्याही प्रकारे गैरफायदा न घेतला जाता किफायतशीर दरामध्ये आवश्यक त्या सेवासुविधा पुरविणाऱ्या वृद्धाश्रमांची गरज आहे. सध्या वृद्धाश्रमांची संख्या, तेथील सोयीसुविधा, आकारले जाणारे दर, पुरविल्या जाणाऱ्या सेवेचा दर्जा सगळ्या बाबतीत खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. वृद्धाश्रम त्यांचा दर्जा, प्रकार या सर्वावर स्वतंत्रपणे लिहायला हवे इतका त्याचा आवाका मोठा आहे; पण वृद्धनिवास या क्षेत्रात वाढीला भरपूर वाव आहे हे मात्र खरे.

वृद्धांच्या इतक्या समस्या आणि या वृद्धसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या संधी दोन्हींचा विचार करता एक लक्षात आल्यावाचून राहात नाही, की यासाठी स्वत: वृद्धांनी काही पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर वृद्धांमुळे ज्या संधी उपलब्ध होत आहेत त्यामध्ये वृद्धांचा खूप आदराने, प्रेमाने विचार होणे आवश्यक आहे. केवळ एक ग्राहक असा दृष्टिकोन संधीचा फायदा घेणाऱ्यांनी ठेवू नये अशी गरज आहे, कारण या वृद्धांच्या आधारावरच संधीचा लाभ घेणारा वर्ग उभा राहाणार आहे, यशस्वी होणार आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या सर्व परिस्थितीला ज्येष्ठांनी कसे सामोरे जावे, घरातल्या प्रत्येकाने काय करावे, सरकारने त्यासाठी काय मदत करावी या दृष्टीने खोलवर विचार होणे आवश्यक आहे. तसे केले तर परिस्थिती सुसह्य़ होणे शक्य आहे हे नक्की.

डॉ. रोहिणी पटवर्धन rohinipatwardhan@gmail.com