देशातील वाढता करोना संसर्ग व मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंती शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली आहे.

खासदार धैर्यशील माने आपल्या पत्रात म्हणतात, “सध्या संपूर्ण देशावर करोनाच्या महामारीचे प्रचंड मोठे संकट आले असताना, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा अतिशय निराशाजनक निकाल लागला. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे व मराठा समाजातील तळागाळातील वंचित असणाऱ्या, तरूण-तरूणींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळे उद्रेक होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. याची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या ३२ टक्के मराठा समाज आणि या समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे.”

तसेच, “शासन त्यासाठी आपल्यापरीने योग्ये ते प्रयत्न करत आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यामुळे केंद्र शासनाने हस्तक्षेप करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रपती महोदय यांनी मराठा समाज आरक्षण विषयावर व करोना महामारीबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता आहे.” असं खासदार माने म्हणाले आहेत.

याचबरोबर “एका बाजूला कोरनामहामारीमुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवड्याने महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे. दुसऱ्या बाजूला मराठाआरक्षणामुळे हवालदिल झालेला तरूण रस्त्यावर उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचे संकट रोखत असताना या दोन्ही प्रश्नांवर मार्ग काढणे आवश्यक आहे. समाज जीवन कुठे विस्कळीत न होता केंद्र शासनाने मराठा समाजाला आश्वस्त करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अपेक्षित आहे. तरी आपण मराठा समाज आरक्षण व करोना महामारी विषयी विशेष संसदीय अधिविशेन बोलावून हे प्रश्न मार्गी लावावे ही विनंती.” अशी विनंती देखील खासदार धैर्यशील माने यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.