प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अलीकडे एका व्हिडिओमध्ये दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

तोच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी मिलिंद देवरांचे समर्थन केले. मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंचे जिवलिग मित्र आहेत.

मुकेश अंबांनीनी मिलिंद देवरांचे केलेले समर्थन हा दक्षिण मुंबईपुरता विषय मर्यादीत नाही. हा देशासाठी एक संदेश आहे. भाजपाचे सरकार जाणार, मोदी पंतप्रधान होणार नाहीत हा त्या मागचा अर्थ आहे असे राज ठाकरे म्हणाले.

‘मोदी है तो मुमकिन है’ जाहीरातीची पोलखोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानातील सभेमध्ये ‘मोदी है तो मुमकिन है’ या जाहीरातीची पोलखोल केली. या जाहीरातीमध्ये मोदींसोबत एका कुटुंबाचा फोटो दाखवला आहे. या संपूर्ण कुटुंबालाच राज ठाकरे यांनी मंचावर आणले व भाजपाच्या जाहीरातीचे पितळ उघडे पाडले.

या कुटुंबाने भाजपाच्या जाहीरातीत काम केले नव्हते. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. भाजपाच्या आयटी सेलवाल्यांनी हा फोटो क्रॉप करुन मोदींच्या फोटोसोबत जोडला व ‘मोदी है तो मुमकिन है’ जाहीरातीसाठी वापरला. हे फक्त एक उदहारण आहे. अशा कितीतरी अजून अशा गोष्टी असतील. भाजपाच्या आयटी सेलकडून खोटया बातम्या पेरल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला.