ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरूद्ध  महसुली प्रमाणपत्र जप्तीच्या (आरआरसी) कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी उगारला आहे. साताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध जप्तीची कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या फलटण येथील ‘शरयू शुगर्स अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड’ या कारखान्याचा समावेश आहे.

‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांविरूद्ध कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक कारखान्यांविरूद्ध  साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘आरआरसी’ काढली आहे. सातारा जिल्ह्यतील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश गायकवाड यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहेत. त्यामध्ये शरयू शुगर्स अ‍ॅग्रो इंडिया लिमिटेड हा कारखाना आहे. याशिवाय सांगलीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू संग्राम देशमुख यांचा खटाव तालुक्यातील ‘ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड’, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी संबंधित ‘लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना’ आणि काँग्रेसचे नेते प्रल्हाद साळुंखे यांचा फलटण तालुक्यातील ‘न्यू फलटण शुगर्स लिमिटेड’ या कारखान्यांविरूद्धही कारवाई करण्यात आली आहे.

या कारखान्यांच्या ‘एफआरपी’च्या थकीत रकमेवर १५ टक्के व्याज, तसेच कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस यांची विक्री करून त्यामधून ‘एफआरपी’ची रक्कम वसूल करण्याचे साखर आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आवश्यकता भासल्यास कारखान्याच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.

आणखी काही कारखान्यांविरूद्ध कारवाई

‘आतापर्यंत ‘एफआरपी’ थकविणाऱ्या शंभरहून अधिक साखर कारखान्यांविरुद्ध ‘आरआरसी’ काढण्यात आल्या आहेत. साताऱ्यातील चार कारखान्यांविरूद्ध ‘आरआरसी’ कारवाई करण्यात आली आहे. येत्या सोमवारी आणखी काही कारखान्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.’

— शेखर गायकवाड, साखर आयुक्त