राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजपाने महाविकासआघाडी सरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार टीका केली. यानंतर आज(बुधवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना, जोरदार भाषण केलं. तर, मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाबद्दल माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

“मराठी भिकारी आहे का? महाराष्ट्र भिकारी आहे का? आम्ही काय…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत संतापले

यावेळी फडणवीस म्हणाले “राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभर कदाजित ते बोलले, पण या तासभरात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाही. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, अमेरिका, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरसह दक्षिणेतही गेले. पण महाराष्ट्राबद्दल मात्र त्या संपूर्ण तासभरात एक वाक्य देखील ते बोलू शकले नाहीत. खरंतर मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते. आता ते नवीन नाहीत, पण चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्यांवर बोलावं लागतं, राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्देवाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा देखील ते मांडू शकले नाहीत. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याबद्दल बोलले नाहीत, बोंड आळीबद्दल ते बोलले नाहीत. विम्याबद्दल ते बोलले नाहीत. वीज तोडणीबद्दल ते बोलले नाहीत. महाराष्ट्रात साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चिंता कुणाची आहे? तर दिल्लीत सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाती आहे, याची चिंता त्यांना आहे.”

‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’ म्हणत करोनाही आला; उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी

तसेच, “मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा देखील अपमान केला आहे. चीन समोर आला की पळे, असं जे मुख्यमंत्री म्हणाले, हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे. ज्या सैनिकांनी उणे ३० डिग्री तापमानात लढाई करून, भारताची एक इंच भूमी चीनला मिळू दिली नाही आणि चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक इंच भूमी देखील चीनला मिळाली नाही, त्या शूर सैनिकांचा जणू काही ते पळपूटे आहेत असा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे.” असा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.