देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून याची सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पहाटे एम्स रुग्णालयात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. मोदींनी ट्विटरला फोटो शेअर करत पात्र असणाऱ्या नागरिकांना देशाला करोनामुक्त करण्याचं आवाहन केलं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लस घेतल्यावरुन कौतुक करताना टोलाही लगावला आहे.

नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस; देशवासियांना आवाहन करत म्हणाले…

“पंतप्रधानांनी करोना लस घेतली आहे. राष्ट्रपती घेतील, केंद्रीय मंत्रीदेखील घेतील. सर्व जनतेला लस मिळायला हवी. पंतप्रधानांनी लस घेतल्याने जनतेचादेखील आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे मोदींनी सर्वासमोर येऊन लस घेत जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. हे महत्वाचं आहे. अमेरिकेत बायडन यांनी लस घेतली तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपलं रक्षण करेल असा विश्वास वाटला. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

…म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

मोदींनी लस घेतली असली तरी त्यामागील निवडणुकीच्या कनेक्शनची चर्चा रंगली आहे. मोदींनी गळ्यामध्ये आसामी लोकांची ओळख आणि प्रतिक मानला जाणारा गमछा घातला होता. हा गमछा त्यांना काही आसामी महिलांनी भेट दिला होता. मोदींसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या नर्सपैकी एकजण पुद्दुचेरीची तर दुसरी केरळची आहे. याबद्दल विचारण्यात आलं असताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “राष्ट्रीय एकात्मता म्हणून पहा ना…हा फक्त काँग्रेसचाच मक्ता नाही ना असं म्हणेन मी. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या अवतीभोवती असतील याची काळजी घेत. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सळमार्गी नेते आहेत”.

“विरोधकांनी सरकारला घेरण्यापेक्षा अधिवेशनाच्या वेळेत काही चर्चा घडवल्या तर ते महाराष्ट्र आणि जनतेसाठी फायद्याचं ठरेल. भाजपामधील प्रमुख नेत्यांना चर्चेची फार आवड असते. त्यांना ही संधी असून चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर नेते उत्तर देतील. त्यामुळे ही संधी ही त्यांनी वाया घालवू नये,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “विरोधकांची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी असं नाही. विरोधक मागण्या करत असतात. ज्या मागण्यांमध्ये कायदेशीरदृष्ट्या तथ्य आहे त्यावर सरकार निर्णय घेईल. आम्हीसुद्धा केंद्रात जाऊन अनेक मागण्या करतो, त्या मान्य होतात का? पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावा अशी आमची मागणी आहे. पण कोणी ऐकतं का? केंद्र सरकार चर्चा करु, ऐकू सांगत असतं. त्याचप्रमाणे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही दोषींना सोडणार नाही असं सांगितलं असून त्यातील गांभीर्य समजून घेतलं पाहिजे”. “तपास पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षाने शांत राहून त्याकडे तटस्थपणे पहायला हवं,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.