“कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांना पोषक वातावरण असून, त्यांचा विजय निश्चित आहे. मंत्री राम शिंदे यांचा किमान साठ हजार मतांनी रोहित पवार पराभव करतील. मात्र, जर ईव्हीएममध्ये गडबड झाला तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि वाडेश्वर कट्टयाचे आयोजक अंकुश काकडे यांनी केला.

पुण्यात मागील सात वर्षांपासून लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस अगोदर वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. यामध्ये निवडणुकीतील अनुभव आणि निकालाविषयी चर्चा करण्यात येते. यावेळी चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, वाडेश्वर कट्टयाचे आयोजक अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, गोपाल चिंतल हे उपस्थित होते.

यावेळी अंकुश काकडे म्हणाले, “लोकसभा, महापालिका निवडणुकीदरम्यान महायुतीमधील अनेक नेते मंडळी जास्त जागा येतील, अशा घोषणा करतात आणि त्याच्या जवळपास पोहोचतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत समाजात शंका निर्माण झालेली आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील महायुतीमधील अनेक नेत्यांकडून २४० जागा येतील, असे सांगितलं जात आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून विविध चॅनेलकडून देखील युतीला २४० आणि आघाडीला ४० अशा जागा येतील, असे दाखविले जात आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. मात्र आता मत मोजणीला काही तास शिल्लक राहिले असून, सर्व चित्र लवकरच स्पष्ट होईल,” असे त्यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, “यंदा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तो प्रतिसाद लक्षात घेता, महाआघाडी १०० जागांवर विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.