महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज(शनिवार) लिलावतीत रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कंबरेचा स्नायू दुखावल्याने त्यांना बसण्यास त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच, तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी राज ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ही फार गंभीर बाब नसून,  त्यांना उद्या  डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना हाता सोबतच पाठीवर दुखापत झाली होती. त्यामुळे पाठीच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली गेली. डॉ. जलील पारकर यांच्या अंतर्गत आज सकाळी त्यांना दाखल करण्यात आले आणि आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

डॉ.विनोद अग्रवाल व डॉ.आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. तसेच, डॉ जलील पारकर देखील शस्त्रक्रिये दरम्यान उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे बरे आहेत आणि ते रुग्णालयाच्या त्यांच्या खोलीत आराम करत आहेत. त्यांना एक ते दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. शस्त्रक्रियेच्या वेळी रूग्णलायात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी आणि सून मिताली हे उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसेच लिलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते. अशी देखील माहिती समोर आली आहे.