राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचं सांगितल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

“भाजपातील काही लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करताहेत”
राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले?; नवाब मलिकांकडून गंभीर आरोप

यादरम्यान भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषाऱ भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत किंवा ते अल्लाहचे गुनाहगार आहेत असं ते म्हणाले आहेत. “रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचं नसतं आणि खोटं बोलायचं नसतं हे लहान मुलालाही कळतं. पण राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक लोक आज महाभयानक अशा संकटात खोटं बोलून समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडं पाडलं,” असं ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “मला वाटतं सत्तेच्या नशेमध्ये रमजानसारख्या पवित्र महिन्याचं पावित्र्य घालवण्याचं काम नवाब मलिक यांनी केलं आहे. म्हणून एक तर ते सच्चे मुसलमान नाहीत किंवा अल्लाहचे गुनाहगार आहेत. कारण त्यांनी रोजा सुद्ध तोडला आहे”.

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – भाजपा
खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा व संसर्गजन्य कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी सोमवारी भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व आमदार कॅप्टन सेल्वम यांनी राज्यपालांची भेट घेतली.

राज्यपालांची भेट घेतल्यावर आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोप केला होता, तेव्हाच मी त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही याचे दोन दिवसात पुरावे सादर करा, परंतु त्यांनी पुरावे सादर केले नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारच्या विषयी नाराजी लोकांच्या मनात खोटे आरोप करून निर्माण करण्याचा प्रयत्न केल, तसंच यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण झालं. मुंबई सोडण्यासाठी लोकांनी रेल्वेस्थानकांवर गर्दी केली. त्यामुळे साथीच्या रोगाच्या कायद्याचा भंग झालेला आहे. या दोन्ही कलमाखाली त्यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करावा, जर राज्य सरकार एफआयआर दाखल करत नसेल, तर राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर करून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आम्ही आज राज्यपालांना भेटलो होतो.”