टोक्यो ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत उलटफेर पाहायला मिळाली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला चौथ्या मानांकित जर्मन खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेवने पराभूत केले. या पराभवामुळे जोकोव्हिचचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. एका कॅलेंडर वर्षात चार मुख्य ग्रँडस्लॅमसह ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यासाठी जोकोव्हिच प्रयत्न करत होता. पण ज्वेरेवने त्याचा स्वप्नभंग केला आहे.

दोन तास रंगलेल्या या सामन्यात ज्वेरेवने जोकोव्हिचला १-६, ६-३, ६-१ असे हरवले. सामन्याच्या सुरुवातीला जोकोविचने शानदार खेळ दाखवला आणि अवघ्या ३७ मिनिटांत पहिला सेट जिंकला. त्यानंतर ज्वेरेवने जोरदार पुनरागमन करत ४५ मिनिटांत दुसरा सेट यानंतर, शेवटच्या सेटमध्येही ज्वेरेवने जोकोव्हिचला कोणतीही संधी दिली नाही आणि त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. ज्वेरेवने शेवटचा सेट ४१ मिनिटांत जिंकला. या विजयासह जर्मनीचा हा खेळाडू अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला. त्याचा जोकोव्हिचविरुद्ध नऊ सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे.

 

हेही वाचा – Tokyo 2020 : मोहम्मद अली यांच्या एका फोटोमुळं पालटलं लव्हलिनाचं आयुष्य!

झेव्हरेवचा आता विजेतेपदाचा सामना रशियाच्या ऑलिम्पिक समितीच्या १२व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हशी होईल. त्याचबरोबर, जोकोव्हिच आणि स्पॅनिश खेळाडू कॅरेनो बुस्टा यांच्यात कांस्यपदकासाठी लढत रंगणार आहे.

काय असते गोल्डन स्लॅम?

नोवाक जोकोविचने २०२१मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून ‘गोल्डन ग्रँड स्लॅम’चे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्याच्याकडे होती. असा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही पुरुष टेनिसपटूला करता आलेला नाही. (यासाठी त्याला ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर यूएस ओपनही जिंकावे लागले असते) टेनिसमध्ये, जेव्हा एखादा खेळाडू एकाच वर्षी चारही ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण जिंकतो, त्याला ‘गोल्डन ग्रँड स्लॅम’ किंवा ‘गोल्डन स्लॅम’ म्हणतात. असा पराक्रम महिला टेनिसमध्ये झाला आहे. जर्मनीच्या स्टेफी ग्राफने ही कामगिरी केली आहे.