पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं. एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. संजय राठोड यांनी राजीनामा देण्यापूर्वी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात शांताबाई राठोड यांनी माध्यमांशी बोलताना “अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी असून, दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी येतो,” असा दावा शांताबाई यांनी केला आहे.

पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी शांताबाई राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शातंबाई म्हणाल्या,”अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी आहे. अरुण दिवसभर बाहेर राहतो आणि संध्याकाळी घरी येतो. अरुणला खूप मोठं आमिष दाखवण्यात आलेलं आहे. तो तोंड उघडणार नाही. जोपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत अरुण तोंड उघडत नाही. आईवडिलांनी लेकरांसाठी आवाज उठवायला हवा. आम्हाला पूजाला न्याय मिळवून द्यायचा आहे,” असं शांताबाई यांनी म्हटलं आहे.

“पूजाच्या वडिलांनी का आत्महत्या करावी, उलट लेकरासाठी त्यांनी बाहेर पडावं. त्यांच्या मनात काहीतरी कारण असावं. मुलगी कर्तबगार असते, त्यावेळस ती चांगली असते. ज्यावेळस तिच्यावर वेळ येते, त्यावेळस आईवडिल का पुढे येत नाही. तरुण तडफदार मुलगी होती. ती मरणारी मुलगी नव्हती. तिचा घात झालाय. तिचा खून झालेला आहे. तिचं पोस्टमॉर्टेम होऊ देऊ नका, असं ती व्यक्ती म्हणते त्यातूनच सगळं कळतंय. काय खोटं आणि काय खरं आहे ते. पुरावा शोधायला तुम्ही देशभर फिरणार आहात का? तुमच्याकडे दोन मुलं आली, त्यांना तुम्ही घरी सोडून दिलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतःची मुलगी समजून त्यांनी पूजाला न्याय द्यावा,” अशी मागणी शांताबाई यांनी केली.