देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले असून वाहनांवरही त्यांच्या वापरानुसार लाल, हिरवा आणि पिवळा स्ट्रीकर लावून वर्गिकरण केलं जात आहे.  शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. अशा लोकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा, मास्क घाला, करोनाचा फैलाव होणार नाही यासंदर्भात काळजी घ्या, नियमांचे पालन करा, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या असे एक ना अनेक जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. मिम्सच नाहीत तर मुंबई पोलिसांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवरही पोलीस अगदी भन्नाट उत्तर देताना दिसत आहे. आपल्या गर्लफ्रेण्डला भेटायला जाण्यासंदर्भात एकाने विचारलेल्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी अगदी भन्नाट उत्तर दिलं असून त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

झालं असं की, राज्य सरकारने कडक निर्बंधांचा निर्णय घेतला असून, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. असं असतानाही अनेकजण गाड्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर गाड्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी नवा नियम तयार केलाय. विनाकारण फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि मुंबई शहरात अत्यावश्यक सेवांशी संबंधित, विशेषत: आरोग्य सेवेशी संबंधित वाहने खोळंबू नयेत यासाठी प्रवासाच्या हेतूनुसार वाहनांना स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या स्वयंघोषित पास योजनेत वाहनांवर लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे स्टीकर वाहनाचे मालक किंवा चालकांनी स्वत:च चिकटवणं अपेक्षित आहे.

नक्की पाहा >> महाराष्ट्र पोलीस तर मिमर्सपेक्षाही सरस… त्यांच्या क्रिएटीव्हीटीला तुम्हीही कराल सॅल्यूट

मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला हे स्टीकर्स लावावे लागतील. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांमुळे शहरात, विशेषत: टोल नाक्यांवर वाहनांची कोंडी होते. प्राणवायू, अत्यावश्यक औषधसाठा वाहून आणणाऱ्या मालमोटारी, रुग्णवाहिका, डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहनेही खोळंबतात. त्यावर उपाय म्हणून स्वयंघोषीत पास (सेल्फ डिक्लेअर्ड पास) ही योजना सुरू करण्यात आली आहे. लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगात अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहनांची वर्गवारी करण्यात आली आहे.

कोणता स्ट्रीकर कोणाला?

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, रुग्णालये, प्रयोगशाळा किंवा निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, आरोग्य विमा अधिकारी, औषध उत्पादक कंपन्या, सॅनिटायझर आणि मुखपट्टी उत्पादक, वैद्यकिय उपकरणे, अन्य वैद्यकीय आणि आरोग्य सेवा या सेवांशी जोडलेले व्यवसाय आणि वाहतूकदार इत्यादींच्या वाहनांना लाल रंगाचे स्टीकर्स लावले जात आहेत.

अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादनाची वाहने, मिठाई उत्पादक आणि वाहतूकदारांच्या वाहनांना हिरव्या रंगाचे स्ट्रीकर्स लावण्यात येत आहेत. तर केंद्र आणि राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, पाणी पुरवठा, वीज आणि वायु पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार कंपन्या, ई कॉमर्स कंपन्या (अत्यावश्यक वस्तू आणि सेवांसाठी मर्यादीत), शासकीय आणि खासगी सुरक्षा रक्षक पुरवठादार, बँक, एटीएम, वित्त आणि विमा कंपन्या, टपाल सेवा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम पदार्थ उत्पादक, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालयांशी संबंधित वाहनांवर पिवळया रंगाचा स्टीकर लावला जात आहे.

याच नव्या नियमाच्या पार्श्वभूमीवर अश्वीन विनोद नावाच्या एका मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन एक प्रश्न विचारला. “माझ्या गर्लफ्रेण्डला भेटायला जाण्यासाठी मी कोणता स्टीकर गाडीला लावला पाहिजे?, मला तिची खूप आठवणय येत आहे,” असं ट्विट विनोदने मुंबई पोलिसांना टॅग करुन केलं.

यावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही गोड बोलून विनोदची फिरकी घेतली. “आम्हाला ठाऊक आहे सर हे तुमच्यासाठी अत्यावश्यक काम आहे, मात्र दुर्देवाने हे आमच्या अत्यवश्यक कामामध्ये किंवा आपत्कालीन कामांमध्ये येत नाही. दोघं प्रेम करणारे एकमेकांपासून दूर असतील तर प्रेम आणखीन वाढतं. त्यामुळेच तुमची प्रकृती सध्या अगदी उत्तम आहे. तळटीप : तुम्ही दोघे आयुष्यभर एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही ते वाक्य केवळ वाक्यप्रचार म्हणून वापरलं आहे,” असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

मुंबई पोलिसांचा हा रिप्लाय नेटकऱ्यांना भलताच आवडला असून, हजारोंच्या संख्येने त्याला रिट्विट मिळाले आहेत.