मोबाईल, इलेक्र्टॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी ऑनलाईन मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. मागच्या काही काळात अगदी छोट्याशा एखाद्या वस्तूपासून ते मोठ्या गुंतवणूकीपर्यंत अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचा ट्रेंड आला आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली असून किराणा मालाच्या मार्केटमध्येही स्पर्धा वाढली आहे. फ्लिपकार्टनेही या बाजारात प्रवेश केला असून अलिबाबा, बिग बास्केट, ग्रोफर्स आणि अॅमेझॉन इंडिया यांना टक्कर देणार आहे. याठिकाणी नागरिकांना स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्व गोष्टी खरेदी करता येणार आहेत. या प्रकल्पासाठी कंपनी २६.४ कोटी डॉलरची गुंतवणूक करत असून ती पुढील तीन वर्षांसाठी असेल असे सांगण्यात येत आहे.

याबाबत फ्लिपकार्टचे किराणा विभागाचे प्रमुख मनीश कुमार म्हणाले, किराणा ही अशी गोष्ट ज्याठिकाणी लोक जास्तीत जास्त पैसे वाचवायला पाहतात. त्या लोकांना आमच्या इथे अतिशय चांगल्या ऑफर्सचा लाभ घेता येईल. काही महिन्यांपूर्वी हा प्रकल्प बंगळुरुमध्ये लाँच केला आहे. याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या काळात कंपनी हा व्यवसाय वाढविण्याच्यादृष्टीने या वर्षाच्या अखेरीस दिल्ली, चेन्नई आणि हैद्राबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपली ही सेवा उपलब्ध करुन देणार आहे. सध्या ग्रोफर्स आणि बिग बास्केट, अॅमेझॉनसारख्या कंपन्या अन्न विभागातील आपल्या व्यवसाय वाढवत आहेत. त्यात आता फ्लिपकार्टची भर पडली आहे. येत्या काळात या बाजारात फ्लिपकार्ट आपले वेगळे स्थान निर्माण करेल यात शंका नाही.