आयसीसीकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आपला पहिलावहिला कसोटी सामना खेळत आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारताविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात हा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चिन्नास्वामीच्या मैदानात छोटेखानी सोहळा पार पडला, ज्यामध्ये अफगाणिस्तानच्या सर्व खेळाडूंना मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले संबंध अधिक मजबूत होतील अशी आशा मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

नाणेफेकीनंतर मैदानात पार पडलेल्या सोहळ्यात भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडही उपस्थित होते. त्यांनीही अफगाणिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने तिन्ही सलामीवीरांना आपल्या संघात जागा दिली आहे. इंग्लंड दौऱ्याला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी, या सामन्यात भारतीय संघ पूरेपूर सराव करुन घेणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.