पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५० हून अधिक जण बाधित

ठाणे : ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बाधित कर्मचाऱ्यांची आकडेवारी रुग्णालय प्रशासन लपवीत असल्याचा आरोप रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केला आहे. ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयातच रुग्ण आढळला आहे. तरीही हे कार्यालय बंद केले जात नसल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे उघड झाले होते. तर, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचेही स्पष्ट झाले होते. या प्रकारांमुळे सध्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संक्रमण वाढत आहे.

करोना स्थिती हाताळण्यात रुग्णालय प्रशासनाची ढिलाई येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची आहे, असा रुग्णालय कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना आखण्याची मागणी केली आहे.

सुरक्षा वाऱ्यावर

या रुग्णालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी केवळ कापडाच्या साध्या मुखपट्टय़ा देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच रुग्णालयात करोना रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करोना चाचण्या करून घेतल्या असून रुग्णालयातील शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

लागण झालेल्यांची संख्या ३० ते ३२ इतकी आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयातील लिपिकाला करोनाची लागण झाल्याचे कळताच कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले. तसेच रुग्णालयाचे सर्वच कर्मचारी करोनाची लागण होऊ नये यासाठी मुखपट्टय़ा, इतर सुरक्षा साधनांचा उपयोग करीत आहेत.

-डॉ. प्रतिभा सावंत, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा