आपल्या समाजात अनेक समृध्द विकासाभिमुख योजनांची निर्मिती करणारे बहुजन समाजातील १८ पगडजातीचे लोक आहेत. पण अनेकांना त्याचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटत असते. विषमता पूर्णव्यवस्थेने निर्माण केलेले थोतांड झुगारून देण्यासाठी भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा स्वतंत्र वाङ्मय प्रवाहनिर्माण होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.दादासाहेब मोरे यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केले. येथे आजपासून पहिले भटके विमुक्त साहित्य संस्कृती संमेलन सुरू झाले.
मुस्लिम बोर्डिंग येथील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक साहित्यनगरीत आयोजित केलेल्या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या हस्ते झाले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा.मोरे बोलत होते. भटक्या विमुक्त समाजाचे साहित्य, संस्कृती यांचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.     
भटक्या विमुक्तांच्या साहित्याविषयी बोलताना प्रा.मोरे म्हणाले, भटक्या विमुक्तांच्या अस्तित्वाविषयी निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्नांबाबत लिहिल्या जात असलेल्या साहित्याचा स्वतंत्रपणे विचार होत नाही. या साहित्याकडे अभ्यासक, समीक्षक, विचारवंत यांनी दलित साहित्याचा एक भाग म्हणून पाहिल्यामुळे या साहित्याला वेगळी चालना मिळत नाही. भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा स्वतंत्ररीत्या विचार झाल्यास ते मराठी साहित्याच्या गुणात्मक वाढीसाठी उपकारक ठरेल.
डॉ.एन.डी.पाटील म्हणाले, राजकीय समतेला आर्थिक आणि सामाजिक समतेमुळे अंतरविरोध निर्माण झाला आहे. भटक्या विमुक्त समाजाची घुसमट होत आहे. राष्ट्राचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या भटक्या समाजाची शिरगणती केली जात नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे साहित्य संमेलन गरजेचे आहे. प्रस्थापित साहित्य व भटके विमुक्तांचे साहित्य यांच्यातील दरी कमी करण्याचे कडवे आव्हान आताच्या प्रबोधनकारांसमोर आहे.    
संमेलनाचे स्वागताध्यक्ष दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमंत शाहू महाराज, प्रा. सुधीर अनवले, कॉ.धनाजी गुरव, अ‍ॅड.सुनिल धुमाळ यांच्यासह साहित्यरसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रशांत नागावकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सत्रानंतर ‘भटक्या विमुक्तांच्या चळवळीची दिशा व दशा’ या विषयावर सुधीर अनवले, ‘मराठी साहित्यातील भटके विमुक्तांचे चित्रण’ या विषयावर डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात नामवंत लेखकांनी आपली भूमिका मांडली. कवी विजय पोवार यांच्या अध्यक्षतेखाली रात्री रंगलेल्या कविसंमेलनात प्रबोधनात्मक कविता सादर झाल्या.