शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीकडून त्यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर आज ते हजर झाले. यावेळी त्यांनी ईडीने फक्त भेटायला बोलावलं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. उन्मेष जोशी यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२१०० कोटींच्या कोहिनूर स्क्वेअर प्रकरणाशी राज ठाकरेंचा संबंध काय? जाणून घ्या

“…तर नरेंद्र मोदी, अमित शाह यांचीही चौकशी झाली पाहिजे” – संजय राऊत

उन्मेष जोशी यांनी ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मला नोटीस मिळाली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. मला ईडीकडून कोणतेही प्रश्न पाठण्यात आलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन. हे कदाचित कोहिनूर इमारतीसंबंधी असावं”.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र मनसे अशा नोटिसीला भीक घालत नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना दिली आहे.

अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तपास सुरू केला आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मलकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.