पुढचा बॉम्ब स्फोट होईपर्यंत वाट पाहायची का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात तोफ डागली. राज ठाकरे यांनी सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांना सज्जड दम दिला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने रविवारी पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला. त्याचा समारोप आझाद मैदान येथे राज ठाकरे यांच्या भाषणाने झाला.

राज ठाकरे म्हणाले की, ”अमेरिकेत जे टि्वन टॉवर्स पाडले गेले त्या पाडण्यामागे ओसामा बिन लादेनचा मेंदू होता. तो लादेनसुद्धा पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात आजपर्यंत अनेक बॉम्बस्फोट झाले. अनेक माणसं मारली गेली. या सगळ्या बॉम्बस्फोटांच्या मागे कोण होतं? मुंबईत १९९२-९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे कोण होतं? बॉम्बब्लास्ट करणारा कोण होता? त्या दाऊद इब्राहिमला सांभारळलं कोणी पाकिस्ताननेच.”

”कुठच्याही देशातील लोकांनी यायचं, कुठेही राहायचं.. कुठेही जगताहेत… माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का या लोकांना? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, ”या देशात अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेत. शिक्षणाचा प्रश्न आहे. आरोग्याचा प्रश्न आहे. पण बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचाही तितकाच प्रश्न आहे. भारताने काही माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. जगातील प्रत्येक देश त्यांच्या-त्यांच्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतो. आज अमेरिकेत, युरोपात आणि ऑस्ट्रेलियात कारवाई सुरू आहे. पोलीस प्रत्येकाला विचारतात की तुमचा पासपोर्ट दाखवा. घुसखोरांकडे पासपोर्ट नसतात. पासपोर्ट नाही असं सांगितल्यानंतर पोलीस त्याला दोन पर्याय सांगतात. एक – तुला तुझ्या देशात परत पाठवतो. दुसरा पर्याय – तुला जेलमध्ये टाकतो. मग ते सुतासारखे सरळ होतात. आम्हाच आपला सगळ्या ठिकाणी माणुसकीचा ठेका घेऊन बसलोय. ”

”मी, इथल्या आणि तिथल्या गृहमंत्र्यांना सांगणार आहे. एक जागा आहे, जिथं अनेक परदेशातील मुल्ला-मौलवी येताहेत. काय चाललंय तिथे? माहीत नाही. मला हे पोलीस खात्यातनंच कळलंय. त्यांनी मला सांगितलंय की, जे काही घडतंय ते चांगलं घडत नाहीए. खूप काहीतरी मोठं घडवताहेत ते… आणि आम्ही काय करायचं? ब्लास्ट झाले की मेणबत्त्या काढायच्या… आमचा विषय संपला. पुढचा बॉम्बब्लास्ट कधी होतोय याची वाट बघायची आम्ही,” असो टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.