प्रो-कबड्डीचं सातवं पर्व आता उत्तरार्धाकडे झुकलं आहे. फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा यू मुम्बाचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्ले-ऑफमध्ये यू मुम्बा आपलं स्थान पक्क करेल असं सध्यातरी चित्र आहे. मात्र सोशल मीडियावर यू मुम्बाचा एक खेळाडू सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘कॉमन रेडकर’ या नावाने यू मुम्बाच्या खेळाडूंसोबत अतरंगी धमाल मस्ती करत असलेला हा अवलिया आहे, मराठमोळा सुशांत घाडगे. सुशांतला आतापर्यंत आपण भाडिपच्या अनेक स्टँड-अप कॉमेडी आणि व्हिडीओंमधून बघितलं आहे. त्याच्या या नवीन अवताराबद्दल लोकसत्ता.कॉमने त्याच्याशी खास गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीचा संपादीत अंश खास तुमच्यासाठी….

१) स्टँड अप कॉमेडी-यू ट्युब व्हिडीओ ते थेट यू मुम्बाचा कॉमन रेडकर, या कन्सेप्टबद्दल काय अधिक सांगशील??

यू मुम्बाला काही प्रमोशनल व्हिडीओ करायचे होते आणि यासाठी ते भाडिपकडे आले होते. माझ्याकडे एक संकल्पना होती ती मी यू मुम्बाला ऐकवली आणि ऐकता क्षणीच त्यांना ती आवडली. त्यातून ‘कॉमन रेडकर’ हे नाव पुढे आलं. मग मी वेगवेगळे व्हिडीओ कसे शूट करता येतील याबद्दल काही कन्सेप्ट सुचवल्या. दोन दिवसांत आम्ही याचं शूट केलं आणि आता याचा निकाल जो काही आहे तो तुम्ही पाहतच आहात.

२) प्रत्येक व्हि़डीओमध्ये तू डोक्यावर मलिंगासारखे केस लावून येतोस, त्यामागचं नेमकं कारण काय आहे??

मलिंगा मला प्रचंड आवडतो, आणि त्याच्या केसांची जा स्टाईल आहे ती देखील मला फार आवडते, त्यामुळे मला कधीतरी ते ट्राय करायचं होतं. दुसरं कारण म्हणजे, एखादं नवीन पात्र जेव्हा तुम्ही प्रेक्षकांसाठी भेटीला आणत असता, तेव्हा त्याची ओळख लक्षात रहावी यासाठी तुम्ही प्रयत्न करता. ‘कॉमन रेडकर’ बद्दल फारसं कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळे या पात्राकडे लोकांचं लक्ष जावं, हा कॉमन रेडकर आहे तरी कोण हे कुतुहल मनात जागं व्हावं यासाठी मी मलिंगासारखे केस लावून येतो.

३) प्रत्येक जण शाळेत एकदा तरी कबड्डी खेळतोच….तुझ्या काही आठवणी आहेत कबड्डीच्या??? कधी ढोपर वगैरे फोडून घेतलं आहेस का??

होय, मी कबड्डी खेळायचो शाळेतून. मी कर्णधार होतो शाळेच्या संघाचा….मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी खूप वाईट खेळायचो. मला एक प्रसंग चांगला आठवतोय तो म्हणजे, एकदा आमच्या संघाकडून मी एकटाच मैदानात उरलो होतो, आणि समोरचा चढाईपटू चढाईसाठी आल्यानंतर मी जिवाची बाजी लावत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आमच्या झटापटीत त्याच्या पँटचा एक तुकडा फाटून माझ्या हातात आला. तो खेळाडू नंतर त्याच्या हाफमध्ये परत गेलाही….पण मग तो आऊट की नॉट आऊट यावरुन बराच वाद झाला होता. आजही तो प्रसंग माझ्या लक्षात आहे.

४) तुला आताच्या यू मुम्बा संघात संधी दिली तर काय बनायला आवडेल?? रेडर, डिफेंडर की कॉमन रेडकर???

आताचा यू मुम्बाचा संघ खरच उत्तम आहे. त्यात मी जाऊन काहीतरी वेगळं करण्याची गरज वाटत नाही. मी मैदानाच्या बाहेर जो धुमाकूळ घालतोय तोच भारी आहे, त्यामुळे मी कॉमन रेडकर म्हणूनच चांगला आहे.

५) मध्यंतरी सर्व खेळाडूंना मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला होतास, तो कितपत सफल झाला आणि कोण चांगलं मराठी बोलायला शिकलं???

यू मुम्बाचे सर्व खेळाडू हे भारताच्या विविध प्रांतातले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला समोरच्या खेळाडूची स्थानिक भाषा थोडी थोडी का होईना येते. प्रत्येकाला थोडं थोडं मराठी निश्चीत येत होतं. पण मी त्यांना अजून मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, जास्तीत जास्त मराठी यू मुम्बाच्या संघात पेरण्याचा प्रयत्न केला आहे.