“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं किर्तनादरम्यान वक्तव्य करून वादात सापडलेले असताना इंदुरीकर महाराज यांच्या पाठिशी भाजपा उभी राहिली आहे. “त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, भाजपा त्यांच्या पाठिंशी आहे,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलंय.

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळे मतं मांडली जात आहेत. काही राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. तर काहींनी त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आणखी वाचा – कोणीही मोर्चे-आंदोलनं करू नका, इंदुरीकर महाराजांची विनंती

चंद्रकात पाटील नेमकं काय म्हणाले?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी पक्षाची भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होतं. इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, भाजपा त्यांच्या पाठिशी आहे. एका वाक्यानं व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,” असं आवाहन पाटील यांनी केलं.

आणखी वाचा – इंदुरीकर महाराजांनी ते विधान करायला नको होतं – भाजपा

काय आहे संपूर्ण प्रकरण?
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. ओझर येथे झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं इंदुरीकर महाराजांनी म्हणाले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला.

आणखी वाचा – इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी

गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी
किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर PCPNDT च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे.