डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील चाचण्यांवरून संशयकल्लोळ

नागपूर : दीक्षाभूमीतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दोन दिवसांआधी करोनाग्रस्त झालेल्या आठ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यांचा अहवाल नकारात्मक आल्याने चाचण्यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. महापालिकांच्या चाचणी प्रक्रियेतच गोंधळ असून जाणीवपूर्वक आमचे महाविद्यालय बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बी.ए. मेहरे यांनी केला आहे.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीमधील १६ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल सकारात्मक आल्याने महाविद्यालयाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. महाविद्यालय ‘सील’ केल्याने बुधवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या केंद्रावर होणारी बी.एड. अभ्यासक्रमाच्या ६०० विद्यार्थ्यांची परीक्षाही रद्द करण्यात आली. मात्र, यातून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या करोना चाचण्यांचा नवा घोळ समोर आला आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील एक कर्मचारी पंधरा दिवसांआधी करोनाग्रस्त झाल्याने संपूर्ण महाविद्यालयाचे निर्जंतुकीकरण करून चार दिवसांआधी महापालिकेची बस बोलावून ५० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये येथील १६ प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण महाविद्यालय परिसर सील केला. त्यानंतर येथील काही कर्मचाऱ्यांनी खासगी प्रयोगशाळेतून पुन्हा चाचणी केली. यातील ८ कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे करोना चाचण्यांच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चाचण्यांचा हा घोळ महाविद्यालय प्रशासनाच्या जिव्हारी लागला असून महापालिकेच्या चाचणी प्रक्रियेतच गोंधळ असल्याचा आरोप होत आहे.

करोनाचे सर्व नियम पाळून आमचे महाविद्यालय सुरू होते. मात्र, महापालिकेच्या करोना चाचणी प्रक्रियेतच गोंधळ आहे. त्यांचा अहवालही चुकीचा निघाला. खासगी प्रयोगशाळेमध्ये सर्वांचे अहवाल नकारात्मक आले. महाविद्यालयाची नाहक बदनामी करून सील करण्यात आले.

– डॉ. बी.ए. मेहरे, प्राचार्य, डॉ. आंबेडकर महाविद्यालय.