आपत्ती असो वा अन्य कुठला प्रसंग नेहमीच भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या मदतीसाठी तत्पर असते.  दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सहजतेने पोहोचता यावे यासाठी भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पादचारी पूल उभारला आहे.

राजौरी जिल्ह्यातील नागरिकांनाही या पूलाचा फायदा होणार आहे. जाबा गावामध्ये ही शाळा आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येताना भरपूर अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शाळा प्रशासनाने लष्कराकडे पादचारी पूल बांधून देण्याची विनंती केली होती. लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

लष्कराने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आठवडयाभराच्या आत हा पूल उभारला. शालेय जीवनात खेळांचे खूप महत्व असते. त्यासाठीच लष्कराने शाळेच्या मैदानातही सुधारणा घडवून आणल्या. शाळा व्यवस्थापन आणि गावकऱ्यांनी लष्कराने पुढाकार घेऊन केलेल्या या कामाचे कौतुक केले आहे.