संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर गंभीर टीका
भारताच्या लष्करी गुप्तवार्ता विभागाचा वापर हा स्वत:साठी करायचा नसतो. यामुळे भारतीय लष्कराच्या देशहिताच्या भावनेला हरताळ फासला जातो. या आधीच्या सरकारने लष्करी गुप्तवार्ता विभागाचा स्वत:साठी केलेला वापर ही अत्यंत चुकीची बाब आहे, त्यामुळे आपल्या भारतीय लष्कराच्या देशहिताच्या भावनेला हरताळ फासला गेला. असे परखड मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी सायंकाळी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी केले. त्यांनी यातून पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. वीरमाता अनुराधा गोरे यांनी लिहिलेल्या व ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘ओळख सियाचीनची’ या पुस्तकाचे त्यांनी या वेळी प्रकाशन केले. सियाचेनसारख्या विषयांवर लिखाण करणे ही चांगली बाब असून वेळोवेळी असे विषय हाताळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
घराणेशाहीतून पुढे आलेल्यांमध्ये राजकारणात काम करण्याची क्षमता असावी लागते. त्यामुळे या घराणेशाहीचा जितका उदो उदो होईल तेव्हा तेव्हा भाजपचा विजय निश्चितच होईल, अशी बोचरी टीका त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
या वेळी सियाचीन रिकामे करण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या माध्यमांकडून सियाचिन रिकामे करा अशी नाहक ओरड केली जात असून तेथे सैन्य असणे हा भारताच्या लष्करी डावपेचांचा भाग आहे. त्यामुळे ते रिकामे करा अशी ओरड करणाऱ्यांना या डावपेचांचे महत्त्व समजलेले नाही. तसेच, पूर्वी साधारण दरवर्षी ८०-९० जणांचे येथे बळी जायचे ती संख्या आम्ही अनेक उपाय योजून कमी केली असून सध्या ती दहापर्यंत खाली आली आहे. आम्ही सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, सियाचीन भारताने रिकामेच करायचे असेल तर त्यासाठी पाकव्याप्त काश्मीर भारतात आले पाहिजे. मात्र हे माझे व्यक्तिगत मत असल्याची त्यांनी नंतर सारवासारव केली. ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी ते म्हणाले की, हे प्रकरण आम्ही उकरून काढले नसून ते इटालियन न्यायालयाने पुढे आणले आहे. आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. तसेच देशभक्ती हा उपजत गुण असावा, ती प्रत्येक क्षणाला नागरिकांकडून दिसलीच पाहिजे. सावरकर जयंती असल्याने त्यांनी सावरकरांच्या ‘तुज वीण जनन ते मरण, तुजवीन मरण ते जनन’ या काव्यपंक्तींचा उल्लेख करत ज्याला या ओळी समजतील तो जेएनयूसारख्या प्रकरणांमध्ये कदापी सहभागी होणार नाही, असे सांगून त्यांनी कन्हैय्याकुमारचाही समाचार घेतला.