सध्या देशभरात फिटनेसचा एक ट्रेंड पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकापासून ते अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत सगळे जण या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होत आहेत. तसेच आपण चॅलेंज पूर्ण केल्यानंतर ते चॅलेंज दुसऱ्याला पास केले जात आहे. याच दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेबलटेनिसपटू मनिका बत्रा हिला दिलेले हे फिटनेस चॅलेंज दिले होते. तिनेही हे चॅलेंज स्वीकारत आपल्या व्यायामाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिने तिच्या दैनंदिन व्यायामातील काही प्रकारांची प्रात्यक्षिके दखवली आहेत. स्वतः क्रीडापटू असल्यामुळे मनिका आपल्या फिटनेस बद्दल कायमच जागरूक असते. त्याचाच प्रत्यय या व्हिडिओतून आला आहे.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, हे चॅलेंज पूर्ण केल्यावर तिने अभिनेता अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, क्रीडापटू अभिनव बिंद्रा, सचिन तेंडुलकर, शरद कमल, वीरेंद्र सेहवाग, सायना नेहवाल, अमलराज, सन्मय, पार्थ, उत्कर्ष यांना चॅलेंज दिले आहे.

या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होत आपला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा करताना दिसले. या सोबत नरेंद्र मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केले. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेले चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ‘हम फिट, तो इंडिया फिट’ ही मोहीम सुरु केली होती. ज्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना हे चॅलेंज दिले होते. मात्र, मला फिटनेस चॅलेंजपेक्षा माझ्या राज्याचा फिटनेस महत्वाचा आहे, असे सांगत कुमारस्वामी यांनी हे चॅलेंज नम्रपणे नाकारले होते.