तिकीट मशिनमध्ये बिघाड होऊन चुकीचे तिकीट दिल्या गेले आणि नेमके तेच तिकीट तपासणी पथकाच्या हाती लागले. त्यामु़ळे चार वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही आपल्यावर कारवाई होईल, सोयरे-धायरे, मित्र व एस.टी.महामंडळ परिवारात आपली नाहक बदनामी होईल या भीतीपोटी माहूर एस.टी. आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर (वय 55) यांनी शुक्रवार (दि.26 फेब्रु) रोजी आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एस.टी. (क्र.एम.एच-20.बीएल-4015) मध्ये गळ्याला फास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

सदर वाहक (दि.24) रोजी माहूर-नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागावच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले. मात्र तिकीट धनोड्यापर्यंतचेच दिल्याची बाब तपासणी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. पोलिसांनी पंचनामा केला असून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे.

मृत वाहक जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगार प्रमुख व्ही.टी.धुतमल यांनी दिली. नादुरुस्त तिकीट मशिन संजय जानकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची बाब  त्यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून उघड झाली असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.