राज्यातील महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपाकडून राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी हे राज्यभरात हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. नवी मुंबईत आयोजित भाजपाच्या राज्य परिषदेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, “महाजनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तो शब्द पाळला नाही, आज राज्यात महिला असुरक्षित आहेत. राजरोसपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण अतिशय उत्तम होते. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचा धाक होता. पण आज राज्यात कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही.”

सत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली

“विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला. सत्तेसाठी शिवसेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तालालसेपायी महापुरुषांचा अपमानही शिवसेना आज सहन करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्भत्सना काँग्रेस सातत्याने करीत आहे. पण त्यावर शिवसेना बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार करीत आहे. पण त्यावरही शिवसेना नेते बोलायला तयार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने आपली सर्व तत्वं गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या कोपऱ्यात ठेवली आहेत.”

“हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्यामुळे भाजपा महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. आज राज्यातील जनतेची ज्या प्रकारे फसवणूक सुरु आहे, त्यामुळे आता सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम भाजपा करणार आहे. यासाठी भाजपा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल,” असे यावेळी पाटील म्हणाले.

“आगामी नवी मुंबई महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह सर्व विरोधक एकत्र येतील. या तिघांविरोधात भाजपा पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल आणि दोन्ही मनपामध्ये भाजपा विजयी होईल आणि आपला महापौरच विराजमान होईल.” असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.