सोशल नेटवर्किंगवर अनेकदा आपण कधी विचारही करु शकत नाही अशा गोष्टी व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे इंटरनेट नावाचं माहितीचं मायाजाल एवढ्या स्वस्तात उपलब्ध आहे की कोणी काहीही पोस्ट करत त्या माध्यमातून एकाद्याची टींगल करत असतं किंवा एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतं. अगदी बोली भाषेत सांगायचं झालं तर सोशल नेटवर्किंगवर दुनियाभरातील गोष्टींचा पाऊस पडत असतो. मात्र काही पोस्ट आणि त्यावर काही कंपन्यांनी दिलेल्या रिप्लाय हे अनेकदा खूपच मजेशीर असतात. असंच काहीसं घडलं आहे भारतातील आघाडीची टेलीफोन नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या व्होडाफोनसोबत.

नक्की वाचा >> गर्लफ्रेंडला भेटायचंय, गाडीवर कुठला Sticker लावू?; मुंबई पोलिसांनी त्याला दिलं भन्नाट उत्तर

झालं असं की, मुंबईमधील पॉडकास्ट कन्सल्टंट असणाऱ्या छावी सचदेव यांनी ट्विटरवरुन एका व्हायरल बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला. “हे कोणी केलं आहे?, खरोखरच मला हसू येत आहे,” असं म्हणत सचदेव यांनी #vodafoneidea असा हॅशटॅग वापरत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमधील बातमीचा मथळा, ‘व्होडाफोन वापरणाऱ्यांना रेंजची अडचण असेल तर ते लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू शकतात, असं भारत सरकारने म्हटलं आहे,’ असा आहे. अर्थात ही बातमी उपहासात्मक पद्धतीच्या बातम्यांपैकीच एक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून ती मागील वर्षी एप्रिलमध्ये प्रकाशित करण्यात आल्याचं स्क्रीनशॉर्टवरुन दिसत आहे.

विशेष म्हणजे उपहासात्मक पद्धतीने केलेल्या या पोस्टला व्होडाफोन आयडियाच्या बातम्या शेअर करणाऱ्या ट्विटर हॅण्डलवरुन रिप्लाय देण्यात आलाय. “सोशल मिडियावर काही वाईट हेतूने काही खोट्या बातम्या आणि मथळे असणारे लेख व्हायरल केले जात असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. अशा खोट्या वृत्तापासून वापरकर्त्यांनी सावध रहावं असा सल्ला आम्ही सर्वांना देतोय. या खोट्या बातम्यांबद्दल संबंधित यंत्रणेला कळवत जा. घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. भारतातील सर्वात वेगवान फोर जी नेटवर्कचा नक्की लाभ घ्या,” असा रिप्लाय सचदेव यांच्या ट्विटला देण्यात आला आहे.

मात्र व्होडाफोनच्या या रिप्लायखाली अनेकांनी नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्याचं दिसून येत आहे.