“रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रास करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली आहे, त्यामुळे ठाकरे सरकारने घाणेरडे राजकारण थांबवून महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी तसेच, आपण केलेल्या आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा” अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू; नवाब मलिक यांचा इशारा

“नवाब मालिकांनी अतिशय खालच्या दर्जाची राजकीय विधानं केली आहेत. करोना सामग्री व सुविधांच अपयश, ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर अभावी होणारे मृत्यू याचं सोयर-सुतक नसणारे नवाब मालिक केंद्राकडे बोट दाखवत आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. लोक मरतायत, आरोग्य व्यवस्था खोळंबली आहे. ऑक्सिजनअभावी लोक मरतील अशा अराजकाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा घाणेरडा प्रकार सरकार करतंय हे दुर्दैवी आहे. नवाब मालिकांनी पूरावे द्यावे, माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा. केंद्राकडे सतत बोटं दाखवत मागण्या करण्यापेक्षा सरकारने कृती करण्याची आवश्यकता आहे. केंद्राने सगळ्या परवानगी दिल्या, केंद्राने सगळं पुरवलं. केंद्रच सगळं करत असेल तर, राज्यकर्ते म्हणून तुमची जबाबदारी काय?” असं दरेकर म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारने निर्लज्ज राजकारण थांबवावे – दरेकर
“ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधाच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे. ठाकरे सरकारने ‘जनाची नाही तर मनाची’ बाळगून या विषयावर चालू केलेले निर्लज्ज राजकारण थांबवावे”, अशी टीका देखील दरेकर यांनी केली आहे.

एका प्रसिद्धीपत्रकात दरेकर यांनी म्हटले आहे की, “रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रसायन, खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. केंद्राने महाराष्ट्राला ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा केल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. देशात क्षमतेच्या ११० टक्के एवढे ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत केंद्रावर आरोप केल्यानेच गोयल आणि मांडवीय यांना ट्विटद्वारे ही माहिती द्यावी लागली आहे. ठाकरे सरकारने जीएसटी भरपाई आणि लसीकरणाबाबत असेच खोटे आरोप करत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लसीकरणाबाबत आकडेवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सरकारला मुकाटपणे गप्प राहावे लागले. एखादी जबाबदारी पेलवली नाही की सरळ केंद्रावर आरोप करायचे ही ठाकरे सरकारची सवयच आहे. ठाकरे सरकारने आता तरी केंद्रावर खापर फोडण्याचे घाणेरडे राजकारण थांबवावे.”

पुरावा द्या नाहीतर माफी मागा; नवाब मलिकांवर भाजपाचा पलटवार

तसेच, “नवाब मलिक यांनी रेमडेसिवीरच्या उत्पादनाबाबत केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय रसायन, खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत मलिक यांना त्या १६ कंपन्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. मलिक यांनी हे आव्हान स्वीकारावे म्हणजे जनतेला वस्तुस्थिती कळेल. आपण केलेल्या आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” असे दरेकर यांनी म्हटले आहे.