नऊ  जणांचा मृत्यू

पुणे : पुणे, पिंपरी आणि परिसरात बुधवारी दिवसभरात ३४० नव्या रुग्णांना करोना विषाणू संसर्गाची लागण झाली. मागील काही दिवसांतील प्रलंबित चाचण्यांच्या अहवालामुळे ही संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यतील रुग्णसंख्या ८४७४ झाली आहे. बुधवारी नऊ  रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३८३ झाली आहे.

नव्याने आढळलेल्या ३४० पैकी २८८ रुग्ण पुणे तर ३० रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. ग्रामीण भागात १२ तर जिल्हा रुग्णालय आणि छावणी परिसरात १० नवे रुग्ण आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी रात्री याबाबत माहिती देण्यात आली. दगावलेल्या नऊ  रुग्णांमध्ये सहा महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. १५ वर्षीय मुलाबरोबरच ४४ ते ८० वर्ष वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतांना इतर आजारांची पाश्र्वभूमी आहे.

बुधवारी पुणे शहरातील २२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ४३४८ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून बुधवारी ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्यामुळे बरे होऊ न घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ३१९ झाली आहे.