भ्रमर-ठाणे

गेल्या काही वर्षांमध्ये गड-किल्ल्यांवर भटकंती करण्यासाठी नियमित जाणारी तरुण पिढी सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करू लागली आहे. त्या विशिष्ट गडावर घडलेला इतिहास जाणून घेण्याबरोबरच तेथील परिसराची ओळख करून घेत आहे. तसेच गडाच्या आसपास राहणाऱ्या वाडीवस्त्यांवरील रहिवाशांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून त्यांना मदतही करीत आहे. ठाण्यातील ‘भ्रमर’ ही अशीच एक संस्था. यंदा या संस्थेने दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे..

महाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अगदी सातवाहन काळापासूनच्या संस्कृतीच्या खुणा राज्यात आढळतात. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे. तिथे घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींप्रमाणेच त्यांचे भौगोलिक स्थानही महत्त्वाचे आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ एक सहल म्हणून गडावर भटकंती करण्यासाठी गेलेल्या मुंबई-ठाण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या एका समूहाला गड आणि किल्ल्यांचा सर्वागीण अभ्यास करावा, असे वाटू लागले. त्यातून दर महिन्याला त्यांनी एका गडाला भेट देण्यास सुरुवात केली. अनुप माळंदकर, ऋचा माळंदकर, भूषण मोहिते, निनाद रेडकर, कैलास भांगरे, राजेंद्र मोरे, रोहित चेत्री आदी तरुणांचा त्यात सहभाग होता. त्यातूनच ‘भ्रमर’ या संस्थेचा जन्म झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी अभिमान वाटत असला तरी प्रत्यक्षात त्या इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी आपल्याकडे कमालीची उदासीनता असते. ‘भ्रमर’ संस्थेने अगदी सुरुवातीपासून त्याविषयी काम सुरू केले. शालेय विद्यार्थी, तरुणांमध्ये इतिहासाविषयी  कुतूहल, आवड निर्माण व्हावी म्हणून ‘भ्रमर’तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गड परिसरात घडलेल्या इतिहासाची स्थानिकांना ओळख व्हावी म्हणून ‘भ्रमर’च्या चमूने त्याचा उल्लेख असलेली पुस्तके तेथील शाळेत दिली. रोह्य़ाजवळील अवचितगड, कसाऱ्याजवळील बळवंतगड, पुण्यातील पुरंदर आदी ठिकाणच्या शाळेत त्यांनी हा प्रयोग केला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी वाटू लागली.

संपूर्ण भारतात १६०० लेणी आहेत. त्यापैकी एकटय़ा महाराष्ट्रात १२०० लेणी असून त्यापैकी ७०० लेणी पुण्यात आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी सहाशे लेणी एकटय़ा जुन्नरमध्ये आहेत. सातवाहन, शिलाहार ते शिवकाल अशा सर्वच काळात जुन्नर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण होते. जुन्नरचे हे ऐतिहासिक माहात्म्य भ्रमरचे सदस्य विविध कार्यक्रमांद्वारे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. गड-किल्ल्यांना नियमितपणे भेटी देण्याबरोबरच इतिहासाच्या अभ्यासाचे विविध पैलू समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न भ्रमर संस्था करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘झुंजार हायकर्स’ या संस्थेच्या मदतीने गेले वर्षभर ‘भ्रमरायण’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात महाराष्ट्र आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि सह्य़ाद्री, शिवाजी महाराज आणि आरमार, महाराष्ट्रातील घाटमाथे, इतिहास आणि ट्रेक अशा विविध विषयांवर परेश कुबल, मकरंद कुबल, डॉ. संजय घरत, डॉ. वसंत भूमकर, श्रेयस जोग आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे ही अभ्यासपूर्ण व्याख्याने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. गड-किल्ल्यांभोवती सापडणाऱ्या जैवविविधतेचा अभ्यास भ्रमरचे काही सदस्य करीत आहेत. गडावरील स्थापत्य कला, त्यांचे राहणीमान, त्यांचा आहार याविषयीसुद्धा अभ्यास केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ८५ गड, किल्ल्यांना संस्थेने भेट दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही मराठेशाहीच्या खुणा आढळतात. त्याचाही अभ्यास संस्था करीत आहे.  दशकापूर्वी भ्रमरचे सदस्य केवळ सहल म्हणून गडावर गेले होते. मात्र आता ही मंडळी इच्छुकांच्या अभ्यास सहली आयोजित करते. विशिष्ट गडावरील इतिहास, तेथील भौगोलिक परिस्थिती, तेथील जनजीवन याची त्यांना ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो. त्याचबरोबरीने अजूनही गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी दुर्गम आणि दुर्लक्षित अवस्थेत जगणाऱ्या रहिवाशांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत सापडणाऱ्या औषधी वनस्पतींचा अभ्यासही या भ्रमंतीतून होत आहे. मुंबई-ठाण्यातही ऐतिहासिक ठेवा (हेरिटेज) असणाऱ्या वास्तू आणि ठिकाणे आहेत. त्यांची सविस्तर ओळख करून देण्यासाठी एक विशेष मोहीम संस्था आता हाती घेणार असल्याची माहिती अनुप माळंदकर यांनी दिली.