पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत हात झटकले आहेत. इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भारताने पुरावे दिले तर नक्की कारवाई करु असं आश्वासनही देत युद्ध छेडल्यास जशास तसं उत्तर देऊ अशी धमकी भारताला दिली.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच इम्रान खान यांनी मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे असं सांगितलं. कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप करण्यात आले आहेत. या हल्ल्याचा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे. पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे असं यावेळी इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत अशी मागणी करत आम्ही कारवाई करु असं आश्वासन इम्रान खान यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारताशी कधीही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं.

दहशतवाद मिटवावा अशी आमचीही इच्छा आहे. 70 हजार पाकिस्तानी दहशतवादामुळे मारले गेले आहेत असं यावेळी त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतात नवी विचारसणी येण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती का आहे याचा विचार भारताने करण्याची गरज आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवला पाहिजे याकडे भारत लक्ष का देत नाही आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा सुरु आहे हे मी समजू शकतो असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी भारताने युद्ध छेडलं तर पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर देणार अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.