मुंबईहून हैदराबादकडे निघालेली हुसेनसागर सुपरफास्ट एक्स्प्रेस सोलापुरच्या पुढे दुधनी रेल्वे स्थानकाजवळ आली असता अचानकपणे रेल्वेरुळावर मोठी फट पडली. परंतु, सुदैवाने ताशी शंभर किलोमीटर वेगात धावणारी गाडी वेळीच थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रवाशांनी बचावल्या गेल्याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडला.
मुंबई-हैदराबाद हुसेनसागर सुपरफास्ट एक्स्प्रेस सकाळी सोलापूरमार्गे पुढे रवाना झाली. अक्कलकोटच्या पुढे व गुलबर्ग्याच्या अलीकडे दुधनी रेल्वे स्थानकाजवळ गाडी सुसाट वेगाने आली असताना अचानकपणे रेल्वे रुळावर मोठी फट पडली. फट पडलेल्या या सदोष रेल्वे रुळावरून गाडी जात असतानाच रेल्वे ट्रँकमेनच्या लाल सिग्नलने इमर्जन्सी ब्रेकद्वारे गाडी जागेवर थांबली. नंतर तपासणी केली असता बोगी क्रमांक चारच्या खाली रुळावर पडलेली फट दिसून आली. फट पडलेल्या रुळावरून गाडी तशीच सुसाट वेगाने गेली असती तर अपघात झाला असता. सुदैवाने पुढील अनर्थ टळल्याचे लक्षात येताच प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाने सुस्कारा सोडला.