जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्क यांच्या ट्वीटकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून असतं. त्यांच्या ट्वीटचे वेगवेगळे अर्थ लावून गुंतवणूकदार पैसे गुंतवत असतात. त्यामुळे त्यांच्या ट्वीटला व्यापार जगतात खूप महत्त्व आहे. एलन मस्क यांनी असंच एक ट्वीट केलं आणि दोन तासांच्या आतच अभासी चलन असलेल्या बिटक्वाइनला घरघर लागली. अवघ्या दोन तासात बिटक्वाइनची किंमत १७ टक्क्यांनी घसरली आहे. बिटक्वाइनची किंमत ५४,८१९ डॉलरवरून थेट ४५,७०० डॉलरवर आली आहे.

‘टेस्ला आता बिटक्वॉइनमध्ये पेमेंट घेणार नाही. बिटक्वाइनचा मायनिंग आणि ट्रान्झक्शनसाठी जीवाश्म इंधनात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोळश्यातून सर्वाधिक खराब उत्सर्जन होतं.’, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. या ट्वीटनंतर बिटक्वाइनमध्ये मोठी घसरण दिसून आली. १ मार्चनंतर आतापर्यंत सर्वात खालच्या स्तरावर बिटक्वाइनची किंमत पोहोचली आहे.

फेब्रुवारी २०२१ च्या रेग्युलेटरी फायलिंगमध्य टेस्लाने १.५ अरब डॉलरचे बिटक्वाइन खरेदी केल्याचं सांगितलं आहे. त्या व्यतिरिक्त बिटक्वाइनमध्ये पैसे घेण्याचंही सांगितलं होतं. मात्र आता एलन मस्क यांनी निर्णय बदलल्याने बिटक्वाइमध्ये घसरण दिसून आली आहे. यापूर्वीही एलन मस्क यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत एक ट्वीट केलं होतं. त्यांनी बिटक्वाइनच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त केली होती. बिटक्वाइनची किंमत वेगाने वाढत असल्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यांच्या या ट्वीटनंतर न्यूयॉर्कमध्ये बिटक्वाइनची किंमत ८ हजार डॉलरने कमी झाली होती.

रिक्षाचालकाला करोनाची लस पडली २५ लाखांना; जाणून घ्या नक्की काय घडलं

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?
आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.