राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाविरोधात मतदान केल्यानंतर गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या मतावरुन काँग्रेस निरीक्षकांनी बरेच प्रश्न निर्माण केले होते. त्यामुळे मी कोणाला मतदान केले असेल हे तुम्हाला समजलेच असेल असे अल्पेशने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि स्मृती इराणी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या दोन जागा रिकामी झाल्या होत्या. या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला तर स्मृती इराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव केला.

काँग्रेसमधले लोक आमचा अपमान करत होते. नेते पक्षातील छोटया कार्यकर्त्यांचे ऐकत नव्हते. या सर्वाचा विचार करुन मी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे असे ठाकोर यांनी सांगितले.