फक्त बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांचेच मेणाचे पुतळे उभारण्यात येतात किंवा देशासाठी अविस्मरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचेच मेणाचे पुतळेच तयार करण्यात येतात असं नाही. आता या सगळ्यात आपले मराठी कलाकारही काही मागे नाहीत. काही महिन्यांपूर्वी ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू, आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे साकारल्यानंतर आता सुनील कंडलूर यांनी सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे मेणाचे पुतळे साकारले आहेत. लवकरच अंकुश आणि अमृताच्या चाहत्यांना त्यांच्या या पुतळ्यासोबत मनोसोक्त सेल्फी काढता येणार आहेत.

देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये या दोघांचे पुतळे साकारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचे अनावरण नितेश राणे आणि स्वतः अंकुश चौधरी, अमृता खानविलकर यांनी केले. गेल्या काही महिन्यांपासून वॅक्स कलावंत सुनील कंडलूर या पुतळ्यांवर अथक मेहनत घेत होते. नावाजलेल्या व्यक्तींचे हुबेहुब मेणाचे पुतळे साकारण्यासाठी सुनील यांना ओळखले जाते. आतापर्यंत त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कपिल देव, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे १०० हून अधिक व्यक्तींचे पुतळे तयार केले आहेत.

लंडनमधील मादाम तुसाँ या आंतरराष्ट्रीय वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर देवगड येथे उभारण्यात आलेले हे म्युझियम अल्पावधीतच स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तुम्ही जर अंकुश आणि अमृताचे कट्टर चाहते असाल तर काही दिवसांनी एकदा देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये जाऊन त्यांच्या मेणाच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढण्यास सज्ज व्हा.