उमेश बगाडे

नीतिकथा, आख्यान, चरित या प्रकारांतील वाङ्मयात अद्भुतकथनाची योजना आहे. अद्भुतकथनाचे तंत्र उत्सुकता, आश्चर्य निर्माण करून रंजन करतेच; पण वाचकाच्या तर्कशक्तीचा विलयही घडवते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हेच अद्भुतकथनाचे तंत्र स्त्रीवर्णन करणाऱ्या साहित्यात अवलंबले गेले, ते कसे?

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिल्या गेलेल्या स्त्रीविरोधी साहित्याची परखड चिकित्सा ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्रीपुरुषतुलना’ (१८८२) या निबंधपुस्तकात केली. ‘मुक्तामाला’ (ल. मो. हळबे, १८६१), ‘मंजुघोषा’ (ना. स. रिसबूड, १८६८) यांसारख्या कादंबऱ्या व ‘मनोरमा’ (म. बा. चितळे, १८७१) या नाटकातील स्त्रियांच्या विपर्यस्त चित्रणावर त्यांनी आक्षेप घेतला. स्त्रियांचे वर्तन उपजतपणे व स्वभावत: व्यभिचारधार्जिणे असल्याचे सांगणाऱ्या ‘स्त्रीचरित’ या वाङ्मयीन प्रकारावर त्यांनी जोराचा हल्ला चढवला.

‘स्त्रीधर्म’ व ‘स्त्रीचरित’ या स्त्री-वर्णनाच्या दोन परस्परविरोधी आकृतिबंधात ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाचा विचार आकार घेत असल्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीचरित या वाङ्मप्रकाराचे पीक आले. रामजी गणोजी यांचे ‘स्त्रीचरित्र’ (१८५४), चिं. दी. जोशी यांचे ‘विदग्ध-स्त्रीचरित्र’ (१८७१) व गोविंद वि. कानिटकर यांचे ‘सुशिक्षित स्त्रियांचे चरित’ (१८७३) या ग्रंथांतून स्त्रीचरिताचे तीन रंग पुढे आले.

रामजी गणोजी यांचे ‘स्त्रीचरित्र’

पारंपरिक चौकटीत स्त्रीवर्णन करणाऱ्या या लेखनामागे वर्गीय आधुनिकतेची ऐट काम करत होती. डॉक्टर हे वर्गीय प्रतिष्ठा दाखवणारे पदनाम कम्पाऊंडर म्हणून काम करत असलेल्या रामजी गणोजी यांनी त्यामुळेच लावले. शिक्षित स्त्रियांना व्यभिचारापासून रोखण्यासाठी १२०० पृष्ठांचा ग्रंथ चार खंडांत त्यांनी लिहिला. व्यभिचार करूनही पतिव्रतापण मिरवण्याची करामत करणारे स्त्री-वर्तन असा प्राचीन संस्कृत वाङ्मयाने प्रचलित केलेला स्त्रीचरिताचा अर्थ त्यांनी स्वीकारला. एका कथेतून दुसरी कथा सुरू करणाऱ्या पारंपरिक आकृतिबंधात स्त्रीचरिताच्या कथांचा रतीब त्यांनी घातला. तसेच स्त्रियांना पातिव्रत्याचे प्रशिक्षण देण्याचे राष्ट्रीय कार्यच आपण करत असल्याचा दावाही केला.

१२व्या शतकातील ‘शुकसप्तति’ या संस्कृत ग्रंथाच्या कथनतंत्राचे अनुकरण रामजी गणोजीने केले. ‘शुकसप्तति’ची प्रभावती ही नायिका पतीच्या अनुपस्थितीत कामवासना अनावर झाल्याने व्यभिचारासाठी बाहेर पडते, तेव्हा तिच्या पतीने दिलेला पोपट कथा सांगण्याच्या मिषाने तिला थांबवतो. व्यभिचार उघड होण्याच्या ऐन वेळी चातुर्याने स्वत:ची सुटका करून उजळपणे पातिव्रत्य मिरवणाऱ्या स्त्रियांच्या ७०-७२ कथा सांगून तो  प्रभावतीला व्यभिचारापासून परावृत्त करतो. ‘स्त्रीचरित्र’मध्ये पोपटाऐवजी डॉक्टर रामजी गणोजी, तर प्रभावतीऐवजी आधुनिक मध्यमवर्गीय स्त्रीचे प्रतीक म्हणून प्रीताई असा बदल रामजी गणोजींनी केला.

पंचतंत्र, हितोपदेश, कथासरित्सागर, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, अरेबियन नाइट्स अशा अद्भुत कथन करणाऱ्या कथासूत्रांची त्यांनी घाऊकपणे उचल केली. स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेला जपणाऱ्या ब्रिटनच्या व्हिक्टोरियन नैतिकतेचा आणि त्यातील प्रवचनशैलीचा प्रभाव त्यात स्वीकारण्यात आला. तात्पर्य म्हणून कथेच्या शेवटी दुर्गुणी, व्यभिचारी, कपटी, विश्वासघाती व अनीतिमान अशा स्त्रीस्वभावाची व वर्तणुकीची निंदा करणारी आणि पातिव्रत्याची आवश्यकता सांगणारी लांबलचक भाषणे पेरण्यात आली.

स्त्री-पुरुषांमधील भेद सांगणारा विषम व विपर्यस्त वर्णनबंध यात गोवण्यात आला. ‘पुरुष दयाळू असतात; व्यभिचारी पत्नीला स्वीकारण्याचे औदार्य बाळगणारे आणि स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे त्याग करणारे असतात,’ असे निरागस वर्णन पुरुषपात्रासाठी योजण्यात आले. त्याउलट- ‘स्त्रिया कपटी असतात; पतीचा त्याग व समर्पण विसरून कामवासनेच्या स्वाधीन होणाऱ्या, कृतघ्नपणे पतिनिष्ठेचा भंग करून व्यभिचार करणाऱ्या, प्रसंगी पतीचा खून करण्यासही तयार असणाऱ्या असतात,’ असे खुनशी वर्णन स्त्रीपात्रासाठी योजण्यात आले.

‘स्त्रीविचाराने चालल्यामुळे, स्त्रीप्रेमाच्या अधीन झाल्याने पुरुषांचा नाश होतो; स्त्रीच्या व्यभिचारी स्वभावामुळे व वर्तनामुळे तिच्या प्रियकराचा, पतीचा व अन्य आप्तांचाही सर्वनाश होतो’- असे तात्पर्य त्यात सातत्याने मांडण्यात आले. स्त्रीदास्य दृढमूल करणारा पारंपरिक तत्त्वव्यवहार त्यात उचलून धरण्यात आला आहे. ‘राज्य करण्यासाठी स्त्रिया अपात्र असतात; पुरुष बीजरूप व स्त्री भूमीरूप असल्यामुळे स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या लेकरांवर पुरुषांचा अधिकार असतो,’ अशा अनेकविध विधानांची त्यात रेलचेल आहे.

पुरुषकेंद्री विचारव्यूहातून लिहिलेल्या ‘स्त्रीचरित्रा’चे उद्दिष्ट स्त्रीनियंत्रणाचे दायित्व स्वीकारलेल्या आक्रमक व हिंसक कर्तेपणाचा प्रसार करणे हे होते. ‘स्वस्त्रियांना वठणीवर आणण्यासाठी हिंसेचा अवलंब न करणारा नेभळट पुरुष हा विधवेचा पुनर्जन्म असतो,’ असे डॉक्टर रामजी गणोजी म्हणतो. व्यभिचारी स्त्रीला कठोर शिक्षा करण्याची मध्ययुगीन कायद्यांमधील तरतूद वासाहतिक कायद्यामध्ये नसल्यामुळे स्त्रिया बेफाम बनत असल्याची खंत तो व्यक्त करतो.

‘सुशिक्षित स्त्रियांचे चरित’

स्त्रीशिक्षणाचा प्रचार करण्यासाठी ‘सुशिक्षित स्त्रियांचे चरित’ हे पुस्तक गोविंद कानिटकर यांनी लिहिले. उपजतपणे दुर्गुणी, व्यभिचारप्रवण असलेल्या स्त्रियांना शिक्षित केल्याने पतिव्रता धर्माचे पालन त्या अधिक आत्मीयतेने करतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. नारदीय कीर्तनशैलीचे अनुकरण करत गद्य-पद्य स्वरूपात चंद्रसेना या शिक्षित नायिकेची कथा त्यांनी सांगितली. कथाकथनाच्या ओघात आर्या व साकी वृत्तामधील काव्यमय विधाने त्यांनी पेश केली आहेत.

ब्राह्मणी पितृसत्तेने घडवलेल्या स्त्री-दास्याच्या विचारव्यूहाचा प्रतिध्वनी कानिटकरांच्या विचारात ठायी ठायी उमटला आहे. स्त्रियांच्या अनावर लैंगिक आसक्तीचे रचित तर त्यात आहेच, पण स्त्री ही पुरुषांच्या मालकीची मौल्यवान वस्तू आहे हे सूत्रही आहे. स्त्रियांना पुरुषांसारखे लैंगिक स्वातंत्र्य देण्यास त्यात विरोध आहे. पुरुषांसारख्या स्वातंत्र्याची कामना स्त्रियांना रसातळाला घेऊन जाईल, ही भयसूचना त्यात आहे. या भयातून निर्माण झालेला बालविवाहाचा आग्रहही त्यात आहे. मुला-मुलींच्या सहशिक्षणाला नकारही आहे. अर्धागिनी म्हणून सद्गुण व पावित्र्यरक्षणाचा एकमेव मार्ग स्त्रियांनी पत्करला पाहिजे, असा उपदेशही त्यात आहे.

शिक्षण हा स्त्रियांच्या चारित्र्यरक्षणाचा रामबाण इलाज असल्याचे कानिटकर सांगतात. शिक्षणामुळे स्त्रिया विनयी, आज्ञाधारक व अंकितसत्त्वाच्या बनतात; स्वेच्छेने पतीचे अनुसरण करणाऱ्या होतात; स्वनियमनाचा मार्ग पत्करून चारित्र्य जपणाऱ्या होतात. त्यामुळे कुलीन घरातील शिकलेल्या स्त्रिया व्यभिचाराचे पाप कदापिही करत नाहीत, असे कानिटकरांचे म्हणणे आहे.

अद्भुतकथनाची परंपरा

नीतिशिक्षणाच्या उद्देशाने स्त्रीचरित लिहिणाऱ्या या लेखकांनी पारंपरिक नीतिसाहित्यातली अद्भुतकथनाची रीत अनुसरली. स्त्रीचरित आणि पातिव्रत्य या दोन्ही रचितांना अद्भुताच्या चाकोरीत त्यांनी मांडले. स्त्रीस्वभावाचे, विशेषत: तिच्या कथित व्यभिचाराचे तर्कविसंगत, अचाट व अविश्वसनीय कोटीत वर्णन करून स्त्रीचरितातील अद्भुताची घडण करण्यात आली. तर दैवी चमत्काराच्या कोटीत पातिव्रत्याला ठेवून अद्भुताची निर्मिती करण्यात आली.

ब्राह्मणी परंपरेतील नीतिकथा, पुराणकथा, आख्यान, चरित या सर्व प्रकारच्या वाङ्मयात अद्भुतकथनाची योजना आहे. अद्भुतकथनाचे तंत्र उत्सुकता, आश्चर्य निर्माण करून रंजन करतेच; पण त्याबरोबर श्रोत्याच्या वा वाचकाच्या चिकित्सक तर्कशक्तीचा विलय घडवून आज्ञाधारक पाल्याच्या अंकित स्थितीत ते त्यांना नेते. जातिव्यवस्थाक पितृसत्तेचा नीतिविचार देण्यासाठी हे सातत्याने अवलंबिण्यात आले.

‘रोमॅण्टिसिझम’ची प्रेरणा

वासाहतिक काळात कांदबरीसारखे साहित्यिक अभिव्यक्तीचे नवे प्रकार आले, नवे घाट-नवा आशय आला. ‘रोमॅण्टिसिझम’ची साहित्यिक प्रेरणाही आली. ‘रोमॅण्टिसिझम’ ही मुख्यत: औद्योगिक क्रांती व प्रबोधनयुगाच्या विवेकशीलतेच्या विरोधातील प्रतिक्रिया होती. निसर्गाकडे, मध्ययुगीनतेकडे जाण्याची त्यात विलक्षण ओढ होती. स्व-अस्तित्वाचे शुद्ध मूळ शोधण्याची त्यात प्रवृत्ती होती. उत्स्फूर्त भावनिक अभिव्यक्ती व कल्पनारम्य साहित्यव्यवहार यांचे त्यात स्तोम होते. अद्भुत स्थळे, कल्पना व घटनाक्रम यांचे वर्णन करण्याची वृत्ती त्यात होती. व्यक्तिवाद होता, व्यक्तीच्या अचाट कामगिरीचे विवरण करण्याची त्यात भूमिका होती.

मध्ययुगीन अद्भुतकथनाच्या परंपरेचा सांभाळ करणाऱ्या ब्राह्मणबहुल नवशिक्षितांना रोमॅण्टिसिझमची ही अभिव्यक्ती आत्मीय वाटली. त्यांनी तिचा अंगीकार करत नवे लेखनप्रकार व अभिव्यक्तीच्या नव्या रीती यांचे अनुसरण केले. कल्पनारम्यतेचे वेड व अद्भुतकथनाची मातबरी मानून त्यांनी साहित्यरचना केली. त्यामुळे पारंपरिक अद्भुतकथनाचे निवेदनतंत्र, प्रतिमाविश्व  व आशय यांचे जडत्व या मराठी साहित्यात कायम राहिले.

‘मुक्तामाला’, ‘मंजुघोषा’, ‘रत्नप्रभा’, ‘विचित्रपुरी’ अशा सुरुवातीच्या कादंबऱ्यांवर रोमॅण्टिसिझमचा प्रभाव होताच; पण त्यापेक्षा संस्कृत व पौराणिक वाङ्मयातील अद्भुतकथनाची छाप अधिक होती. ‘मोचनगड’सारख्या ऐतिहासिक कादंबरीवर पुरुषी पराक्रमातील अद्भुतता सांगण्याच्या रोमॅण्टिसिस्ट प्रवृत्तीचा प्रभाव होता. आधुनिक मराठी साहित्यात रूढावलेली ही अद्भुतकथनाची प्रवृत्ती एकीकडे स्त्रीचरिताची अद्भुतता नकारात्मक चौकटीत रेखाटत होती, तर दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या पराक्रमाची अद्भुतता विधायक चौकटीत चितारत होती. त्यातून स्त्रीदास्याचा विचारव्यूह दृढमूल होत होता. म्हणूनच ताराबाई शिंदे यांनी त्याला हल्ल्याचे लक्ष्य बनवले!

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com