भारतीय जनता पार्टीचे महाष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र त्यापूर्वी या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र त्याचवेळी पाटील यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घेतली यासंदर्भातही खुलासा केलाय.

भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीय. यामागील मुख्य कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. त्यामुळेच आज राज ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीमध्ये भाजपा आणि मनसेदरम्यानच्या युतीबद्दल चर्चा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत.

तसेच पुढे बोलताना पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा ठाम असल्याचं सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भातील गोंधळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ देणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील आज सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपला मान्य नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे संकेत पाटील यांनी यापूर्वीही दिले आहेत.

फडणवीस यांनीही दिलेले संकेत

जून महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीमध्ये मनसेची परप्रातींयांसंदर्भातील भूमिका युतीमध्ये किंवा दोन पक्षांची मत जुळण्यामध्ये अडथळा ठरत असल्याचं मत व्यक्त केलं होतं. आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आमचा अजेंडा व्यापक आहे. जी काही क्षेत्रीय अस्मिता असते ती आमच्याकडे आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करु. पण क्षेत्रीय अस्मितेसोबत आम्हाला राष्ट्रीय अस्मिताही आम्हाला महत्वाची आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसाठी म्हणजेच मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही यासाठी दुसऱ्यावर अन्याय करायचा आणि आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देत नाही अशी भूमिका घेणं आम्हाला योग्य वाटतं नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. क्षेत्रीय अस्मिता एक नंबरवर असली तरी राष्ट्रीय अस्मिता विसरता येणार नाही, या मताचे आम्ही आहोत असंही फडणवीस म्हणाले. ही मतं आता तरी आमची आणि मनसेची वेगवेगळी आहेत. ती मतं जुळी तर वेगळा विचार करता येईल. पण आज तरी ती जुळत नाहीयत. ती जुळत नसली तर युतीचा कोणता प्रश्नच निर्माण होत नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.