कुटुंबीयांचे आवाहन

लोकमानसातील संभ्रमाचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे साहित्य विपरीत स्वरूपात समाजापुढे आणणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी ‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी एकत्र यावे, अशी इच्छा पुलंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

दोन संस्थांनी त्यासाठी हवे तर स्वामित्व हक्काची (रॉयल्टी) रक्कमही काही प्रमाणात विभागून घ्यावी. त्यामुळे पुलंच्या नावावर चाललेली अंदाधुंदी, त्यांच्या साहित्याची चालवलेली बेजबाबदार भेसळ थांबेल, हीच पुलंना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उत्तम भेट ठरेल, अशी भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

पुलंचे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे आणि भाचे डॉ. दिनेश ठाकूर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. पुलंचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आणि काही वाहिन्यांवरून पुलंच्या साहित्याची भेसळ करून कार्यक्रम सादर होत असल्याने हे स्पष्टीकरण करीत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

पुलंच्या पश्चात सुनीताबाईंनी आपल्या मृत्युपत्राद्वारे पुलंची नाटके संहिता, त्यातील शब्द न बदलता सादर करण्याचे (फक्त प्रयोग) हक्क खुले केले. फक्त नाटकांचे प्रयोग करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणालाही रॉयल्टी देण्याची गरज नाही. मात्र पुलंची नाटके व इतरही पुस्तकांचे सुनीताबाईंकडचे हक्क त्यांनी पुण्याच्या ‘आयुका’ या विज्ञान संस्थेकडे हस्तांतरित केले.

समजोपयोगी उपक्रमांना मदत करता यावी, यासाठी स्थापन केलेल्या पु. ल. देशपांडे फाऊंडेशनचे, पुलंच्या पाल्र्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेत विलीनीकरण झाल्यावर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. त्यामुळे पुलंच्या काही साहित्याचे कॉपीराइट आपल्याकडे आले आहेत, असा काही लोकांचा आणि खुद्द लोकमान्य सेवा संघाचा समज झाला. मात्र असे कोणतेही अधिकार लोकमान्य सेवा संघाकडे आहेत, असे दाखवणारी कोणतीही कागदपत्रे न्यायालयातही दाखल झालेली नाहीत. उलटपक्षी पुलंच्या पश्चात सुनीताबाईंच्या निधनापर्यंत पुलंच्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडीओ इत्यादी परवानग्या सुनीताबाईंनी स्वत:च दिलेल्या आढळतात.

आपल्या पश्चात आपल्या संपूर्ण साहित्याचे सर्वाधिकार ‘आयुका’ या विज्ञान संस्थेला देण्यामागे सुनीताबाईंचा उद्देश उघड आहे. आपल्या साहित्याचा समाजासाठी उपयोग व्हावा, ही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, त्याचबरोबर पुलंचे साहित्य दर्जेदार स्वरूपातच समाजासमोर यावे आणि त्यात होणारी भेसळ वा मोडतोड टळावी, अशी कुटुंबीयांची इच्छा असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.