राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने, राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. मात्र असे असतानाही सर्व नियम झुगारून बावधान (ता.वाई) येथे पारंपारिक बगाड यात्रा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली खरी, मात्र आता ही यात्रा गावकऱ्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. कारण, आतापर्यंत या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना व बगाड यात्रेत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व आठ कर्मचाऱ्याना देखील करोनाचा संसर्ग झाला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी नियमोल्लंघन

शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानंतरही नंतरही मोठी गर्दी जमवत बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर आता दहा दिवसांनी बावधन आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधील ग्रामस्थांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून येते आहे. आजपर्यंत ६१ ग्रामस्थांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बाधितांची संख्या थोपविण्यासाठी बावधन आणि परिसरातील प्रत्येक घरातील ग्रामस्थाची तपासणी करणे आवश्यक झाले आहे.

बगाड यात्रेप्रकरणी अडीच हजार लोकांवर गुन्हा

संचारबंदी आणि प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली. यामध्ये सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले . त्यानंतर तहसीलदार रणजित भोसले यांनी सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी ११० ग्रामस्थांना अटक करण्यात आली होती.

वाई : बंदीचा आदेश झुगारुन बावधनला झाली बगाड यात्रा; १०० हून अधिक जणांना अटक

आजपर्यंत एकूण ७७ ग्रामस्थांना करोनाची बाधित झाली. यातील ६२ ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत. संबंधित ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले वाढती रुग्ण संख्या ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थ स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत नाहीत. आरोग्य विभागाच्या सहकार्याने तातडीने बावधन आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. वाई तालुक्यात करोना बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.