पुण्यामधील एका स्टार्टअपकंपनीने थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक भन्नाट मास्क तयार केलं आहे. एका औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने हे मास्क निर्माण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या मास्कच्या संपर्कात येणारे करोना विषाणू नष्ट होतील. या मास्कला सुसायडल म्हणजेत आत्मघाती या शब्दाच्या आधारे व्हिरोसाईड्स असं म्हटलं आहे.

थीनसीआर टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं हे मास्क बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे. या मास्कवर विषाणूचा नाश करण्यासाठी विशेष कवच (कोटींग) वापरण्यात आलं आहे. हा कोटींगची चाचणी करण्यात आली असून ते सार्क-कोव्ही-२ म्हणजेच करोना विषाणूचा खात्मा करण्यात प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे. या कोटींगसाठी वापरण्यात आलेला पदार्थ हा सोडियम ओलीफीन अल्फोनेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. साबणामध्ये फेस निर्माण करण्यासाठीसुद्धा हेच रसायन वापरलं जातं. करोना विषाणू या मास्कच्या संपर्कात आल्यावर विषाणूच्या वरील भागातील कवच नष्ट होतं. पर्यायाने विषाणूचा संसर्ग होत नाही. हे मास्क बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी हा सर्वसामान्य तापमानामध्ये टीकून राहू शकतात, त्याला विशेष काही काळजी घेण्याची गरज भासत नाही. तसेच हे पदार्थ कॉसमॅटीक निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने त्यांच्या उपलब्धतेबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> आयुर्वेदातील ही वनस्पती करोना विषाणूची वाढ रोखण्यात ९८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरते; संशोधकांचा दावा

डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीअंतर्गत काम करणाऱ्या टेक्नोलॉजी डिपार्टेमंट बोर्डाने (टीडीबी) या मास्क निर्मितीच्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य केलं आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी काय उपाययोजना शोधता येतील यासंदर्भात केंद्राने हाती घेतलेल्या मोहीमेअंतर्गत हे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. मोठ्याप्रमाणात निर्मिती करण्यासाठी निवडण्यात आलेल्या मोजक्या प्रकल्पांपैकी पुण्यातील या कंपनीच्या मास्कचा समावेश टीडीबीने केलाय.

नक्की वाचा >> मुस्लीम समाजातील लोक करोनाची लस घेण्यास टाळाटाळ करतात; माजी मुख्यमंत्र्यांचं मत

नेरुळमधील मार्क लाईफ सायन्स कंपनीसोबत थीनसीआर कंपनीने या मास्कची निर्मिती केलीय. या मास्कला कोटींग करण्याचं काम मार्क लाईफ सायन्स करते. थ्री डी प्रिंटींगच्या माध्यमातून बनवलेल्या मास्कवर समान कोटींग करण्याचं काम येथे केलं जातं. विशेष म्हणजे ही कोटींग कोणत्याही एन ९५ मास्क, थ्री प्ले मास्क अगदी साध्या कापडाच्या मास्कवरही करता येते.

नक्की वाचा >> हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर

थीनसीआर कंपनीचे संस्थापक आणि निर्देशक डॉ. शितलकुमार झांबड यांनी आमच्या कंपनीचे मास्क हे ९५ टक्क्यांहून अधिक प्रभावी आहेत. या मास्कची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यास कंपनीने सुरुवात केली असून पेटंटसाठीही अर्ज करण्यात आला आहे. आतापर्यंत कंपनीने ६००० मास्क हे एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चार सरकारी रुग्णालयांना मदत म्हणून दिलेत. यामध्ये नंदूरबार, नाशिक, बंगळुरु येथील रुग्णालयांचा समावेश असल्याचं विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रालायने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.