डान्सबार सुरु करण्यावर अद्याप राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. तरीही मुंबईसह उपनगरात विना परवाना, छुपे डान्सबार खुलेआम सुरु आहेत. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईत हे वास्तव समोर आले आहे. समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री चार डान्सबारवर छापा टाकून कारवाई केली.
दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात समाजसेवा शाखेने विनापरवाना सुरु असलेल्या या डान्सबारवर छापा टाकून ६० बारबालांची सुटका केली. तसेच बारमालक, व्यवस्थापक व ग्राहकांसह ८० जणांच्या विरोधात नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारला परवानगी दिली असली तरी राज्य शासनाने डान्सबारला परवानगी देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. ग्रॅण्टरोड येथील तेजस बार, घाटकोपरमधील मेहफिल बार, अंधेरीतील पिंक प्लाझा बार व मुंबई सेंट्रलच्या समुद्रा बारवर समाजसेवा शाखेने छापा टाकला.